☆ प्राक्तन…. ☆ सौ. जस्मिन रमजान शेख ☆
प्राक्तनाच्या हातमागावर अनुभवाचा धोटा उजवं अन् डावं करत एकसारखा धावत होता. कधी हा रंग कधी तो…., दोरा कधी वर कधी खाली, कधी मागून पुढे कधी पुढून मागं, अनेक रंगांचे, अनेक प्रकारचे धागे एकमेकांत गुंफून आयुष्याचं एक वस्त्र तो विणत होता.ते सुंदर बनेल की कुरुप हे त्याचं त्यालाच माहीत नाही. फक्त विणत रहायचं, धावत रहायचं येवढंच त्याला माहीत ! बाकी सगळ रहस्यच!
आवडता रंग हाती आला की गडी जाम खूश! मग हव तसं, हव तिथं तो रंगवून घ्यायचा, अनेक दोऱ्यात माळून सुंदर नक्षीकाम करून घ्यायचा. त्याला आवडेल तसं दोरा वर खाली हलवायचाआणि त्यातून निर्माण झालेल्या चित्राकडे, आपल्याच निर्मिती कडे गौरवाने पहात रहायचा. वाटायचं हे क्षण असेच रहावेत. हा आनंदाचा रंग कायम आपल्याच हातात रहावा. दुःखं,संकटं, विघ्न अशी छिद्रे आपल्या वस्त्राला नकोच. सौंदर्य नष्टच होईल ना मग! इतरांनी आपलं वस्त्र बघितलं की नेहमी वाह वाहच केली पाहिजे असंच त्याला वाटायचं!
पण शेवटी नियतीच ती! उचललेला चहाचा पेला ओठांपर्यंत पोहोचायच्या आधी कोणती अन् किती वादळ उठवेल सांगण कठीण! आयुष्य नावाचा खेळ असाच असतो ना! खेळ अगदी रंगात येतं अन् अचानक एका छोट्याशा चुकीनं सर्वस्व उद्धवस्त होतं. जणू काही त्या धोट्याच्या हातात नासका, कुजका, तुटका धागा येतो अन् सुंदर विणलेल्या कापडाला भली मोठी भोकं पडत जातात. कधी एकमेकांत गुंतलेले धागे निसटू लागतात, कधी घट्ट बसलेली वीण उसवू लागते, तर कधी धागेच एकमेकांना तोडू लागतात.
किती विचित्र! वेळ बदलली की धाग्यांचे रंग सुद्धा बदलत जातात. जवळचे कोण, लांबचे कोण हे लक्षात यायला लागतं. काल पर्यंत अगदी मिठी मारुन बसलेले धागे झटक्यात लांब पळतात. जवळ कोण नसतच अशावेळी . सहाजिकच मोठं छिद्र निर्माण होणारच की तिथं! वेळच तशी येते ना. आणि मग हा आयुष्याचा खेळ नकोसा होऊन जातो. कारण अगदी जवळच्या धाग्यांनी सुद्धा साथ सोडलेली असते. स्वतः होऊन असेल किंवा नियतीचा घाला असेल तो. पण छिद्र पडलेलं असतं हे मात्र नक्की! अशा वेळी काय करावं सुचत नाही. पुन्हा तोच तुटलेला दोरा बांधून घ्यावा म्हटलं तर धोट्याला माग कुठं जाता येतं. तो पुढेच पळणार.
मागचं बदलता येत नाही अन् पुढचं रहस्य उलगडत नाही. एकच पर्याय हाती असतो. फक्त धावत राहणं, पळत राहणं,आलेला प्रत्येक क्षण अनुभवत राहणं..बस्स..!
अशा वेळी कधी कधी कोणाचा आधाराचा धागा आपल्या वस्त्रातील छिद्राला सांधण्याचा प्रयत्न करत असतं. पहिल्या सारखं साफाईदारपणा नसतो त्याच्यात, ओबडधोबड का होईना, पण छिद्र झाकलं गेलं याचंच समाधान!
काहीतर खूप मोठं गमावल्याची सल कायम सलत राहते पण खूप काही चांगल अजून शिल्लक आहे याची आस सुद्धा लागून राहते. हीच तर खरी मेख आहे या प्राक्तन नावाच्या रहस्याची! हे रहस्य उलगडण्यासाठी, आयुष्याचं एक सुंदर वस्त्र विनण्यासाठी हा अनुभवाचा धोटा कायम धावत राहणंच योग्य आहे. आपण फक्त त्रयस्तासारखं त्या आयुष्यरुपी वस्त्राकडे पहात रहायचं, संकटाच्या वेळीपण मन शांत ठेवून आलेल्या प्रत्येक क्षणाचा स्वीकार करायचा, कारण त्यामुळेच मार्ग सापडत जातं, हवं ते गवसतं आणि महत्त्वाचं म्हणजे भविष्य बदलत जातं.
म्हणूनच या प्राक्तनाच्या हातमागावर अनुभवाचा धोटा उजवं अन् डावं करत एकसारखा धावत असतो. कधी हा रंग कधी तो………नेहमी सारखंच………
© सौ. जस्मिन रमजान शेख
मिरज जि. सांगली
9881584475
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈