सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “गाडी घुंगराची आली… गाडी घुंगराची…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

व्हाट्सअपच्या ग्रुपवर काही अनपेक्षित असा खजिना मला मिळाला आहे.

जे मी कधी वाचले नव्हते ऐकले नव्हते असे अभंग गाणी वाचायला आणि ऐकायला मिळाली… त्याचा मला खूप आनंद झाला. हा ठेवा मी वहीत लिहून ठेवला आहे. आता कधीही काढून वाचताना पुनःप्रत्ययाचा आनंद घेता येतो .

 

यात काही गजानन महाराजांची पदे आली होती.

“गजानना या करी आवाहन आसनस्थ   व्हावे”

हे गजानन महाराजांचे आवाहन आले होते .त्यातील सहज शब्द मनाला भावतात. यात त्यांची यथासांग  पूजा सांगितली आहे…. आणि शेवटी..

 

“मिटतील चिंता हरतील व्याधी टाळतील आपत्ती

गजाननाच्या कृपाप्रसादे सहजमोक्ष प्राप्ती…”

असे शब्द आहेत..

 

कृपाप्रसाद….

 या शब्दाजवळ थोडं थांबायचं… विचार करायचा…

या प्रसादाची  गोडी किती अपूर्व असेल नाही का….. हा एकदा खाऊन संपणारा प्रसाद नाही….

त्यांची कृपा झाली की मन भरणार आहे .अजून काही हवं ही भूक संपणार आहे.

 

त्यांच्याकडे एकच मागणं आहे. डोक्यावर तुमचा वरदहस्त असू दे ….मग त्यानंतर काही मागायचे मनात येणारच नाही. 

“गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची….”

प्रत्यक्ष गजानन महाराजांची घुंगराची गाडी तिला न्यायला आलेली आहे. मग काय काय झालं असेल याचं सुरेख वर्णन या गीतात आहे…

 

तिच्या हातात वैराग्याची बांगडी भरली, सज्ञानाचे पातळ तिला नेसवले आणि संत गुरु कृपेची चोळी शीऊन दिली… आणि हे सगळं दृढनिश्चयाच्या पाटावर बसवून…

असेल कुणाच्या नशिबात असे माहेरपण… 

या शब्दांनी आपण थक्क होतो….ही शिकवण आपल्यासाठी पण आहेच की…हे  वाचल्यावर आपोआप समजते .

 

नंतर त्यांनी तिला मोक्षपदाची वाट दाखवून दिलेली आहे. 

लेकीचं मन कशानी शांत होणार आहे हे त्यांच्या शिवाय अजून कोण जाणणार……

 

“लागली समाधी सारे दंग समाधीत…..”

लागली समाधी…  मध्ये हृदय मंदिरात महाराजांना बसवून त्यांची मानसपूजा कशी करायची हे सांगितले आहे. ही वाचतानाच माझ्या मनातच ती पूजा सुरू होते….पूजा झाली की प्रसाद आलाच…

पण तो कशाचा मागायचा हे समजावून सांगितले आहे…

घर ,पैसा, अडका नकोच….. आता हवी आहे फक्त मन:शांती

किती सुरेख मागणं आहे ना… वाचून आपण लगेच भानावर येतो…

खरंच आहे एकदा मनःशांती  मिळाली की बाकी काही मागायचं मनातच येणार नाही…

 

एका गाण्यात गजानन महाराजांना एका भक्ताने जेवायला बोलावले अशी कल्पना केली आहे… प्रत्यक्ष महाराजांचे जेवण… त्यात सगळ्या पदार्थांची रेलचेल आहे पक्वान्नांपासून महाराजांना आवडणाऱ्या पिठलं भाकरी पर्यंत…. आपण वर्णन ऐकत राहतो …. अगदी सजवलेलं ताट आपल्याला समोर दिसत असतं ….आणि शेवटी…

“अन्न ब्रह्म हे तुम्ही म्हणाले म्हणून हे  ब्रह्म्याचे पूजन…”

…. ही ओळ आपल्याला जागेवर आणते. विचारांना प्रवृत्त करते… महाराजांच्या प्रकटीकरणापासूनची कथा समोर येते. त्यांनी काय सांगितले आहे ते आठवायला लागते….

 

सुरेल आवाजातली गजानन महाराजांची बावन्नी ऐकत रहावी…

“चिंता साऱ्या दूर करी

संकटातुनी पार करी….”

महाराज आहेतच  आपल्याला सांभाळायला असे समजून घेऊन शांतपणे हे ऐकत बसावे…

ऊठूच नये…

 

घरात बसून वाचत राहू…. अभ्यास करत राहू….

पुढचं महाराज ठरवतील तसं…

बोला गजानन महाराज की जय !!!! 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments