सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर
मनमंजुषेतून
☆ – तेजस्वी पित्याचे ते वात्सल्याचे हात..! – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆
(सोनेरी संक्रांत)
(आमचे दातार बाबा आता 94 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत त्यानिमित्त त्यांना अनंत शुभेच्छा…)
१४ जानेवारीची संध्याकाळ. मी आणि सुनील नुकतीच मैत्री झालेल्या आमच्या एका मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला स्कूटरवरून, अंधेरीला चाललो होतो. त्यादिवशी मुंबईत प्रथमच इतकं झोंबरं गार वारं वाहत असेल. गार गार वारं खात, शिवाजी पार्कहून अंधेरीला पोहोचेस्तोवर आमचाच बर्फ होऊन गेला होता!
माझी मैत्रीण अनिताने (वाकलकर) अत्यंत प्रेमानं आमचं स्वागत केलं आणि आम्हाला घराच्या गच्चीत नेलं. तिथं ए.सी.पी. श्री.व सौ.लोखंडे, जयकर काका, अनेक कार्यक्रमांचे आयोजक, अनिताचे आईवडील, बहीण अशी काही मंडळी जमली होती. गप्पाटप्पा झाल्यावर लोखंडेंनी बेंजो वाजवून आणि काही इंग्लिश गाणी गाऊन पार्टीत साजेल अशी धमाल आणली! जयकर काकाही नेहमीप्रमाणे या आनंदात सामील झाले होते. आता माझीही गाण्याची वेळ येणार, हे मी जाणून होते.
काळा फ्रिलवाला फ्रॉक घातल्याने आधीच पाय गारठून गेले होते. त्यात गावं लागणार, या विचाराने आणखी थंडी वाढत गेली. मित्रमंडळींची धमाल संपल्यावर, मला सर्वांनी गायला सांगितलं. अगदी घरगुती समारंभ असल्याने, मीही लगेच मानेनं होकार दिला. जयकर काकांनी फर्माईश केलेलं ‘मैं मंगल दीप जलाऊँ’ हे भजन मी गायलं. थंडीमुळे हरकतीही सरास्सर येत होत्या! गाणं नेहमीप्रमाणे झालं.
तिथं जमलेल्या मंडळींपैकी, साठीच्या आसपासचे एक सदृहस्थ मला येऊन भेटले. “अहो, तुम्ही गाणं छान म्हटलंत, पण याची कॅसेट मिळू शकेल काय? मी आत्ताच त्याचे पैसे देतो.” मला मनातून खूप हसू आलं, पण चेहऱ्यावर मी दाखवलं नाही. मराठी माणूस आणि ताबडतोब पैसे देऊन कॅसेट घ्यायची स्पष्ट तयारी? मी मनात म्हटलं, ‘असेल बुवा…. !’ आणि त्यांना सांगितलं, “माझी ‘मंगलदीप’ नावाची कॅसेट मी तुम्हाला देऊ शकते. ते म्हणाले, “उद्या सकाळी मी माझ्या माणसाला पाठवतो.”
त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्यांचा ड्रायव्हर दोन्ही हातात लालकंच, टचटचीत स्ट्रॉबेरीची दोन प्युनेट्स घेऊन आला. “आमच्या दातार साहेबांच्या शेतावरची हायेत.” तो म्हणाला. “दातार साहेबांनी कॅसेट मागितली व त्याचे हे शंभर रुपये!” मी त्यांना कॅसेट दिली व पैसे नकोत म्हणून खुणेनंच सांगितलं. मला खूपच गंमत वाटली. कितीतरी वेळ मी त्या स्ट्रॉबेरीकडे पाहात होते आणि मनातल्या मनात हसत होते. मला स्ट्रॉबेरी आवडते म्हणून नाही – तर कॅसेट दिली म्हणून स्ट्रॉबेरी दिली त्यांनी? असो. पण छान झालं म्हणून मी तो विषय तिथंच सोडला.
३१ जानेवारी १९९४. माझ्या स्वतंत्र कार्यक्रमाला ‘मंगलदीप’ नावाने अधिष्ठान लाभलं आणि तो दिवस दोन्ही अर्थांनी माझ्या आयुष्याला सुरेल वळण देणारा, सुंदर कलाटणी देणारा ठरला. हा ‘तेजाचा मंगलदीप’ माझ्या आयुष्याला उजाळा देणाराही ठरला. ती माझ्या आयुष्यातली ‘सोनेरी संक्रांत’ होती!
तो कार्यक्रम गोरेगांवच्या अभिनव कला केंद्रातर्फे त्यांच्या शाळेच्या हॉलमध्ये होता. हॉल गच्च भरला होता. राजेश दाभोळकरांची सिस्टिम असल्याने माइक टेस्टिंग करतानाच आज कार्यक्रम सुंदर होणार, रंगणार, हे माझ्या लक्षात आलं. ‘मैं मंगलदीप जलाऊँ, ‘केव्हा तरी पहाटे’, ‘काय सांगू शेजीबाई’, ‘लव लव करी पातं’, अशी अनेक गाणी झाली. दातारसाहेब, अनिताच्या वडिलांबरोबर माझ्यासाठी फुलांचा सुंदर गुच्छ घेऊन आले होते. जयकर काकांनीही छान गुच्छ आणला होता. मला आपल्या ओळखीच्या लोकांनी कौतुक केलेलं पाहून खूप बरं वाटलं. कार्यक्रम खूपच रंगला, तसा दुसर्या दिवशी सर्वांचा फोनही आला. आणि आश्चर्य म्हणजे, मला न सांगता, गुपचूप दातार साहेबांनी या कार्यक्रमाची ऑडिओ कॅसेट मोठ्या हिकमती करून मिळवली! हे त्यांनी आमच्या पुढच्याच भेटीत प्रांजळपणे सांगितलंही!
असे हे नाशिकचे संपूर्ण दातार कुटुंबीय माझ्या गाण्यांचे चाहते! दातार साहेबांची पत्नी निर्मला, ही माझ्या ‘निवडुंग’ चित्रपटातील ‘केव्हातरी पहाटे’ आणि ‘लवलव करी पातं’ या गाण्यांच्या जबरदस्त प्रेमात! ‘ही छोटी पद्मजा संगीताच्या क्षेत्रात आणखी पुढे कशी जाईल? त्यासाठी आपल्याला काय करता येईल?’ असा विचार नेहमी निर्मलाकाकूंच्या मनात असे.
३१ जानेवारी १९९४ च्या रात्री उशीरा नाशिकला घरी पोहोचल्यानंतर, दातार साहेबांचा मुलगा राजन, सून शोभना, आणि नात स्नेहा यांना ती कॅसेट त्यांनी ऐकवली. त्यावर तत्काल या सर्वांच्या प्रतिक्रिया मला देण्यासाठी दुसऱ्या दिवशी फोन केला आणि म्हणाले, “स्नेहा केवळ दहा वर्षांची आहे. तुम्ही सादर केलेल्या ‘मैं मंगलदीप जलाऊँ’ या पहिल्याच गाण्यामध्ये ‘तू प्रेम का सागर बन जा, मैं लहर लहर खो जाऊँ’ या ओळी स्नेहाने ऐकल्या. ते सूर तिच्यापर्यंत पोहोचले आणि त्यात ती हरवून गेली. एका दहा वर्षांच्या मुलीला खिळवून ठेवणारी सुरांमधली ती ताकद बघून, आम्हां सर्व कुटुंबियांचा तुमची काही गाणी रेकॉर्ड करण्याचा निर्णय त्याक्षणी पक्का झाला.”
दातार परिवाराच्या या स्नेह आणि आशीर्वादातून ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’, ‘रंग बावरा श्रावण’, ‘घर नाचले नाचले’, ‘गीत नया गाता हूँ’, या ध्वनीफितींचा, तसंच अनेक उर्दू गझला, अभंग, गीते यांचा जन्म झाला. ही फेणाणी-जोगळेकर आणि संपूर्ण दातार परिवारासाठीही परम आनंदाची गोष्ट आहे! या सगळ्या ध्वनीफितींच्या रेकॉर्डिंग दरम्यान आम्हां दोन्ही कुटुंबियांच्या गाठी भेटी वाढल्या, आणि हे दातारसाहेब आमच्या संपूर्ण कुटुंबियांचे ‘दातारबाबा’ कधी झाले, ते कळलंच नाही!
अशा ह्या तीर्थरूप दातारबाबांनी मला वैयक्तिक, सांस्कृतिक, सांगितिकदृष्ट्या सर्वार्थाने घडवलं, त्यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त मी काय गाऊ, काय बोलू, असा प्रश्न मनात असतानाच, नाशिकचं आणि साहित्यातलं आपलं सगळ्याचं दैवत म्हणजे आदरणीय कुसुमाग्रज, अगदी श्रीकृष्णासारखे माझ्या मदतीला स्वप्नात धावून आले आणि कानात कुजबुजले, ‘पद्मजा, ज्यांच्यासाठी संगीत, साहित्य, कला, हाच परमोच्च आनंद आहे, परमेश्वर आहे आणि जीवनाचं हेच वैभव आहे, त्या आपल्या बाबांना तू एकच सांग…’
‘तुझेच अवघे जीवित वैभव काय तुला देऊ?
काय तुला वाहू मी काय तुला वाहू?…’
आज मला आठवते, ती १४ जानेवारी १९९४ची माझी आणि सुनीलची, बाबांशी झालेली पहिली भेट! मकरसंक्रांतीचा दिवस! त्यादिवशी एकदाच त्यांना, “तिळगूळ घ्या आणि गोड बोला” म्हणायची संधी मिळाली. कारण त्यानंतर त्यांच्यासारख्या स्पष्टवक्त्या माणसाला, गोड बोला म्हणणं, फार कठीण होतं! कधी कधी संगीतावरून, कवितेवरून आणि अनेक गोष्टींवरून आम्ही कैकवेळा अगदी कचाकचा भांडलो. अगदी जन्माचे वैरी असल्यासारखे! पाहणाऱ्याला वाटेल की झालं, आता सारं संपलं! पण त्यानंतर फक्त १० मिनिटांतच बाबांचा फोन येतो, “अगं, पद्मजा, आज वृत्तपत्रात वाचलेल्या एका लेखात, पत्रकार टेंबे काकांच्या लेखात इंदिरा संतांच्या कित्ती सुंदर ओळी आल्यात पहा…. अगदी चित्ररूप आहेत !”
*“दारा बांधता तोरण, घर नाचले नाचले,
आज येणार अंगणी सोनचाफ्याची पाऊले”*
खरोखरीच अस्साच सोनचाफ्याचा सुगंध घेऊन बाबा आमच्या आयुष्यात आले.आणि इंदिराबाईंच्या शब्दांप्रमाणे…
“येऊ देत माझ्या घरी किरणांचे झोत .. तेजस्वी पित्याचे ते वात्सल्याचे हात”….
असे वात्सल्याचे हात अगदी थेट, कधी आईच्या तर कधी वडिलांच्या मायेने आम्हां सर्वांच्या पाठीवरून कौतुकाने फिरले.
जगावं कसं? वागावं कसं? शब्दोच्चार स्पष्ट कसे म्हणावेत? कागदावरील शब्द ‘जिवंत’ करून ‘अर्थपूर्णरित्या’ कागदातून बाहेर कसे काढावेत, याचं भान मला बाबांनीच दिलं. सुरुवातीला वाटायचं दगड, माती, सिमेंट, धोंडे यात बुडालेला बिल्डर मला काय सांगणार? मी हट्टी! कलावंत ना! माझा हेका मी सोडत नव्हते, परंतु हळूहळू लक्षात आलं, या नाशिकच्या मातीत, काश्मीरसारखं जसं प्रत्यक्ष केशर फुलवून त्यांनी यश खेचून आणलं, तसंच माझ्या गाण्यातही, ही जाण वाढवून केशराचा सुगंध पेरला!
‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’ रेकॉर्ड करत असताना, कवितेचा प्रत्येक शब्द न् शब्द स्पष्ट नि भावपूर्ण आला पाहिजे, याकडे त्यांचा आवर्जून कटाक्ष असे. सर्वस्व तुजला वाहुनी’ या गझलेतील ‘हुंदका’ हा शब्द, मला हुंदका फुटेस्तोवर माझ्याकडून गावून घेतला. ही गझल जेव्हा कुसुमाग्रजांनी माझ्याकडून पहिल्यांदा ऐकली, तेव्हा विंदांच्या शब्दांच्या ताकदीमुळे तात्यांचे (कुसुमाग्रजांचे) पाणावलेले, तरीही तृप्त डोळे मला आजही आठवतात.
कोणतीही कविता गाण्यापूर्वी, बाबा त्या कवितेतील प्रत्येक शब्दाच्या अर्थाचा, उच्चारांचा माझ्याकडून अभ्यास करवून घेत. ‘गीत नया गाता हूँ’ या माजी पंतप्रधान अटलजींच्या कविता ऐकून दुसरे माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी, त्यांच्या कविता स्वरबद्ध करायला दिल्या. यातील काही कविता तीन ओळींच्या तर काही साडेसात ओळींच्या…… त्या भावपूर्ण होतील, अशा पद्धतीने बाबांनी मला जोडून दिल्या. इंडस्ट्रीतील सर्वोत्तम सर्व कलाकार, उत्कृष्ट रेकॉर्डिंग स्टुडिओत रेकॉर्ड करून तासन्तास बाबा त्यात रस घेऊन संगीताचा, रेकॉर्डिंगचा अभ्यास करायचे, तेही न थकता अत्यंत उत्साहाने! संगीत हे त्यांच्यासाठी कायम ‘S’ Vitamin चं ठरलं.
माझा मुलगा आदित्यशी, त्याच्याच वयाचा होऊन क्रिकेट खेळणारे, त्याला आईच्या तक्रारी बिनदिक्कत सांगायला हक्काचं स्थान असलेले आजोबा दातारबाबा! सुनीलला, माझा भाऊ विनायकला, महत्त्वाच्या प्रसंगी योग्य मार्गदर्शन करणारे, उषाताईला, अटलजींचे पोर्ट्रेट करताना प्रोत्साहन देणारे बाबा, नाईक, खरे, धारप, सुभेदार इत्यादी सर्व मित्रांशी गप्पा मारताना सात मजली गडगडाटी हास्य करणारे, ‘गीत नया…’ कॅसेटचा सोहळा दहा दिवसांत करा, असा, पी.एम. हाऊसमधून फोन आला असताना, कधीही न घाबरणारे, पण दहा दिवसांत थाटात सर्व काही झालं पाहिजे, या विचाराने थरकापणारे, पण निश्चयाचा महामेरू असणारे, नात स्नेहाचे नृत्य डोळ्यातून प्रेम ओसंडून पहातानाचे बाबा, दगड, विटा, माती, धोंडे यांनी घेरलेले बिल्डर बाबा, त्यातून मला कवितेचे विविध रंग समजावणारे बाबा, लेक राजनच्या अफाट बुद्धिमत्तेविषयी, प्रगतीविषयी ऊर भरून कौतुक करणारे, सून शोभनाचेही कौतुक करणारे, पत्नी निर्मलाने त्यांना कसे विविध विषयांत घडवले, हे अभिमानाने सांगणारे बाबा, तसंच आमच्या सर्वांचा ‘उंच उंच माझा झोका’ पाहताना उचंबळून येणारे, सर्वांवर प्रेमाचा अतिवर्षाव करणारे बाबा, अशी ही बाबांची अनेक वेगवेगळी रूपं मला वेळोवेळी दिसतात म्हणून म्हणावंसं वाटतं,
‘आई, बाबा, मित्र, गुरू, अन् तुम्ही संगीतसारथी;
तुम्हापुढे फिकेच पडतील, अतिरथी महारथी…!’
© सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈