डॉ. जयंत गुजराती

??

घन तमी… ☆ डॉ. जयंत गुजराती

शिशिर सरला. वसंतपंचमी ही येऊन गेली. ऋतुबदलाचे संकेत केव्हापासूनचेच. ऊन आता मी म्हणत असलेलं. रात्री तर गारवा अजूनही झोंबणारा. रात्र आली की उदासीनतेची छाया पसरून राहते, मनाच्या कणाकणावर. खिडकीशी येऊन बसलं की थंडावत असलेली रात्र जागी होते. रात्रीला कोलाहल तसा कमीच. रस्त्यावरची वर्दळ कमी कमी होत गेली की शांतता अवतरते. बराच वेळ टिकणारी. त्या शांततेच्या उदरातही बरंच काही लपलेलं असतं. अभोगी,  अव्यक्त, तेही अंतस्थ, म्हणजे ते तसं असतंच सदानकदा, पण रात्रीने दारावर टकटक केले की ते अकारण असलेलं मनातलं बरंच काहीचं अस्तित्व टोकदारपणे जाणवू लागतं, मग स्वस्थ असणं काही होत नाही. तमाचा खेळ पाहत बसण्यापलिकडे काहीसुद्धा होत नाही,  घडत नाही.  एक दीर्घ श्वास, उच्छ्वास निसासा काही म्हणो….

एकेक पान गळून निष्पर्ण झालेलं झाड समोर खिडकीशीच. एकाद्या व्रतस्थ मुनीसारखं उभं असलेलं. बोलेल काही, आताच. लगेच. वाटत राहतं. सारखं निरखणं त्याला. तसा तो एकाकीच. वाटतं की तो बोलला तर सगळ्या जखमा उघड्या करेल. तसं त्यालाही उचंबळून येत असेलच की. कुणीतरी ऐकणारं लाभावं म्हणून तरसून गेलाही असेल. खोलवरच्या, वरवरच्या जखमांचं दालनच असेल. मूळापासून ते टोकापर्यंत. तडतडणाऱ्या साली, भेगाळलेला बुंधा. हिरवं काही नसण्याची निराशा आणि झुंज गारठ्याशी. पाऊसकाळ अजून तसा लांबच, भिजवून टाकायला. जमीन तशी कोरडीच.  हात आकाशाला टेकायचे म्हणून वर वर वाढणं तेव्हढं झालेलं, पण हेमंत व शिशिराने सारे वैभव लुटून नेलेलं. एक साधं इटुकलं पानही राहू दिलं नव्हतं फांद्यांवर. कोण काळाचे वैर उभं राहिलेलं. तग धरणं तेव्हढं हातात. गारठ्याबरोबर असतो वारा तोही अचूक सूड उगवतो. 

कधीकधी उत्तर, मध्य वा पूर्वरात्रीच चंद्र उगवतो, तो काही सूड उगवत नाही. उलट त्याचं असणं हे आश्वासक थोडंफार. तसा तो लांबच, पण शुभ्रधवल किरणांची पखरण करून बापजन्माचा दाह शमवण्याचा त्याचा प्रयत्न, तोही कधीकधी केविलवाणा भासणाराच. तोही किती पुरणार? जेथे शीतलतेचीही धग वाटावी ही परिस्थिती. किती काढावी कळ? किती सोसावं? 

नेहेमी निळंशार असणारं आभाळही राखूडलेलं. एकदा का दिवाकर मावळला की आभाळ रंग बदलतंच.कितीही असोत टिमटिमणारे तारे, ते अनंत असलेलं आभाळ गूढ वाटू लागतं. तेही अनंत. तसं असलं तरी जितकी भूमी हवीशी तितकंच आभाळही. ते परकं नसतंच कधी. दिवसभराची दगदग संपली की एकांतात तेच साथीला. बस न्याहाळत रहावं त्याला. निरूद्देश. काहीच बोलू नये, काही सांगू नये. फक्त एकमेकांपुरतं असण्याचंच नातं! बस तेव्हढंच पुरे!! 

पर्णहीन असलेल्या खोडावर एखादा निशाचर येऊन बसतो सावकाश. विसावा घेऊन झालं की देतो कर्णकर्कश हाळी व पंख फैलावत उडून जातो. काहीक्षण वाटत असतं आहे कुणीतरी सोबतीला, पण ते काहीक्षणच. हवी असते तशी साथ, यावं कुणीतरी, गुजगोष्टी कराव्यात, ख्यालीखुशाली विचारावी, मनमोकळं करावं, रितं व्हावं. आपलंसं होऊन जावं, पण ते तितकसं सोपं नसतं. मोकळं होता येतच नाही. आभासी क्षणिक जवळीक तशी आभासीच. निष्पर्ण वृक्षावर घरटं कधी करतात का पाखरं?

दिवस चटकन निघून जातो. रात्र सरतासरत नाही. ती सरपटत असते हळुहळू गोगलगायीसारखी. दूरसुदूर तमाचं साम्राज्य. दिवा लावो वा निओनसाइन्स. तमाचं राज्य अढळच, एकछत्री. क्षणाक्षणावर अंमल त्याचा. हटता हटत नाही तो काळोख, आत आत झिरपत जात असलेला, जन्मोजन्मीचं नातं असल्यागत. तो काळोखही आवडायला लागतो कधी ते कळतही नाही. मग रात्र होण्याची वाट पहायची सवयच लागते. काळोखाला घट्ट मिठी मारण्यासाठी. काळोखाला नसतात दिशा, काळोखाला नसतात मार्ग. काळोखाला नसतो तळ वा नसते गती. काळोख बऱ्याचदा असतो गोठून जाणारा क्षण. तोही कल्पेच्या कल्पे वाटावा असा. त्या गोठलेल्या काळोखाचं सौंदर्य शिल्पीत करावं अशी एक शलाका क्षणभर चमकून जाणारी. तीही निखळणाऱ्या ताऱ्यागत, उल्कागत. तरीही  तम, काळोख आपला वाटावा तो क्षण मोलाचा! 

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments