श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ मनमंजुषेतून ☆ ऋणानुबांधाच्या गाठी’ – भाग 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
आर्थिक कारणाने सरकारने सासवड येथे चालवलेली ही शाळा ७२ साली बंद केली. मग आण्णा-वहिनी पुण्याला त्यांच्या घरी आले. त्यानंतर त्यांच्या सासवडच्या किती तरी विद्यार्थिनी, कधी मुला-बाळांना घेऊन, कधी नवर्याला घेऊन आण्णांकडे यायच्या. उज्ज्वलाचे वडीलही पुण्यालाच राह्यचे. त्यामुळे एस.एस.सी.ची परीक्षा झाल्यावर, तीदेखील पुण्याला आली. उज्ज्वला काळे पुण्यातच होती. त्यामुळे तिचे येणे वारंवार घडू लागले. कधी मुलांना घेऊन, कधी वडलांना, कधी भावाला. असं होता होता, उज्ज्वला आणि तिचा परिवार आण्णांच्या गोतावळ्यात कधी मिसळून गेला, कुणालाच कळलं नाही.
आण्णा तिला एकदा म्हणाले, ‘नुसता एस.एस.सी.चा काय उपयोग? तू डी.एड. हो. ‘नुसती सूचनाच नाही. तिच्या मागे लागून तिला डी.एड. ला प्रवेश घ्यायला लावला. तिचा अभ्यास करून घेतला. मग यथावकाश प्राथमिक शाळेत नोकरी, कायम होणं, हे सारं घडून गेलं. उज्ज्वलाचा संसार मार्गी लागला. हे सारं होईपर्यंत एखाद्या डोंगरासारखे आण्णा तिच्या मागे उभे राहिले. आण्णांचे हे ऋण उज्ज्वला नेहमीच मानते. ती म्हणते, `आण्णा नसते, तर लोकांच्या घरी धुणं-भांडी करून मला मुलांना वाढवावं लागलं असतं.’
उज्ज्वला मराठा समाजातली. वडील चांगले पदवीधर. पण समाजाची म्हणून एक रीत-भात असते. चाकोरी असते. तिचं लग्नं लवकरच, म्हणजे बाराव्या-तेराव्या वर्षी झालं. दोन मुले झाली आणि पठोपाठ वैधव्याच्या दु:खाला सामोरे जायची वेळ आली. आपघर उध्वस्त झाल्यावर बापघर जवळ करणं आलं. तिथे आसरा, तात्पुरता आधारही मिळाला. पण कुटुंब मोठं. मिळवता एकटा. आसरा मिळाला तरी आपल्या पिलांच्या चारा-पाण्याची व्यवस्था तरी आपल्याला बघायला हवी. त्यासाठी शिक्षण हवे. आईने मुलांना संभाळायचे मान्य केले आणि उज्ज्वला सासवडला राहिली. दोन वर्षात शालांत परीक्षा ती उत्तीर्ण झाली.
बुद्धिमान माणसे आपल्या कर्तृत्वावर पुढे जातात. सामान्य वकुब व कुवत असलेल्या व्यक्तींमध्ये चैतन्याची, जिद्दीची ज्योत पेटवावी लागते. `तू ही गोष्ट निश्चितपणे करू शकशील, असा आत्मविश्वास जागवावा लागतो. ‘आण्णांनी उज्ज्वलाच्या बाबतीत नेमके हेच केले. उज्ज्वला सामान्य बुद्धीची मुलगी असली, तरी कष्टाळू होती. `परीक्षेत पास होणे मुळीच अवघड नाही’ असा विश्वास त्यांनी तिच्यात निर्माण केला. तिचा अभ्यास घेतला. तिला मार्गदर्शन केले. म्हणूनच ती म्हणते, `आण्णांमुळेच मी आज शिक्षिका म्हणून उभी आहे. एरवी मला इतरांच्या घरची धुणं-भांडी करून मुलांना वाढवावं लागलं असतं.
– क्रमश:
© श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈