सुश्री नीता कुलकर्णी
☆ “असंही घडतं…?” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
वीस वर्षांपूर्वीची गोष्ट.
तेव्हा आम्ही सांताक्रुजला राहत होतो. चर्चगेटला जायचं असेल तर अकरा वाजता च्या लोकलने जात असू. ती अंधेरी वरून सुटत असल्याने तिला (त्याकाळी) फार गर्दी नसे.
त्या दिवशी मी व माझी मैत्रिण निघालो. गाडीत उजव्या बाकाजवळची सीट मिळाली.
समोर एक बाई होती .तिने गुजराती पद्धतीने साडी नेसली होती आणि घुंगट अगदी खालीपर्यंत घेतलेला होता. तिचा चेहरा दिसतच नव्हता. शेजारी सुमारे पाच व तीन वर्षाच्या दोन मुली होत्या. त्यांच्या अंगावर स्वस्तातले पण नवीन फ्रॉक होते. दोन्ही मुलींच्या हातात कॅडबरी होती. शेजारी प्लास्टिकच्या पिशवीत बिस्किट होती.
गाडी सुटली आणि त्या बाईने दोन्ही मुलींना जवळ घेतले. त्यांचे पापे घेतले. मुलींना कुरवाळले…..
आणि जोरजोरात रडायला लागली. अगदी तारस्वरात ती रडत होती.
” झालं का परत सुरु …गप्प बैस.. काय झालं ग इतकं रडायला…. “
एक बाई तिला रागवायला लागली. आम्हाला काही कळेना..
“अहो सारखी रडते आहे . काय झालय काही सांगत पण नाहीये. नुसती गळे काढून रडतीय “
सगळ्या नुसत्या तर्क करायला लागल्या..
“कोणी घरी वारलं असेल..”
“नवरा मारत असेल …”
“भांडण झाल असेल…”
” नवऱ्याने सोडलं का काय….”
प्रत्येक जण कारण हुडकत होतो. खार स्टेशन येईपर्यंत तिचं रडणं चालूच होतं ….
मुलींना प्रथमच इतकी मोठी कॅडबरी मिळालेली असावी. त्या मजेत खात होत्या .
गाडी बांद्राकडे निघाली .थोडावेळ ती गप्प होती. आता परत रडणं सुरू झालं ……
मुलींना सारखी मिठीत घेत होती. जवळ घेत होती…. कोणी किती रागवलं तरी ती रडायची थांबतच नव्हती. सांगून सांगून बायका दमल्या …तरी तिचं रडणं सुरूच होतं.
…. बांद्रा गेलं तशी ती गप्प झाली शांत झाली .
प्रत्येक जण आपापल्या नादात… काही वेळानंतर आम्ही पण दोघी तिला विसरून गप्पा मारायला लागलो.
आम्ही नंतर तिच्याकडे पाहिलंही नाही….. माहीम येईपर्यंत तिचा आवाज बंद होता.
माहीम आले.. उतरणाऱ्या बायका उतरल्या चढणाऱ्या चढल्या…
मध्ये चार-पाच सेकंद शांत होते……..
… आणि अचानक ती बाई उठली.. प्लॅटफॉर्मवर उतरली. आणि सरळ पळत पळत निघूनच गेली….
त्याच क्षणी लोकल पण सुरू झाली….. क्षणभर काय झालं आम्हाला कळलच नाही..
“बाई पळाली … बाई पळाली “
एकच गडबड झाली…
“पोलिसांना फोन करा”
“दादरला गाडी गेली की बघू “
“साखळी ओढायची का “
“अशी कशी गेली”
… एकच आरडा ओरडा गोंधळ सुरू होता….
तेवढ्यात कोपऱ्यातून एक आवाज आला …
” ती बाई काळी का गोरी कोणी बघितलेली नाही आपण तिला ओळखणार ही नाही..”
.. अरे बापरे खरंच की ..
शांतपणे ती बाई म्हणाली …..
” पोरींना टाकून ती बाई पळून गेली आहे … ..आणि मध्ये आपल्याला काही करता येणार नाही गाडी चर्चगेटला गेल्यावर बघू “
खरचं की पुढच्या प्रत्येक स्टेशनवर गाडी जेमतेम दोन मिनिटं थांबणार तेवढ्यात काय करणार?
सगळ्यांना ते पटले…. प्रचंड भीती कणव…. दोन्ही पोरी तर रडायला लागल्या…
विचारलं ” कुठे राहता? “
“तिकडे लांब “…. एवढेच सांगत होत्या. काय करावं कुणालाच कळेना.
दादर आलं गेलं .
मुलींना कोणीतरी सांगितलं ..
“थोड्या वेळाने आई येणार आहे हं…” त्यामुळे मुली गप्प बसल्या.
धाकटीला आता झोप यायला लागली होती .ती मोठी च्या मांडीवर झोपली . मोठी रडून रडून शांत झाली होती. बहिणीच्या अंगावर हात टाकून बसली होती .
… विलक्षण करूण असं दृश्य होतं. अक्षरशः आमच्या सगळ्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या .
“अशी कशी ही आई …” एवढच म्हणत होतो..
स्टेशन येत होती जात होती..
एक बाई म्हणाली…..
” मी वकील आहे. मुलींना मी पोलिसांच्या ताब्यात देईन. माझ्याबरोबर तुमच्यापैकी कोणीतरी चला.”
“पोलीस ” ….म्हटल्यावर आधी सगळ्यांचे चेहरे घाबरले. नंतर आम्ही सगळ्याच तयार झालो. चर्चगेट जवळ आलं तसं त्या छोटीला उठवलं .दोघींनी त्यांचे हात धरले.
त्या सारख्या म्हणत होत्या … ” मला आई पाहिजे.. मला आईकडे जायचंय .. आईकडे नेणार ना…”
“हो हो “….असं सांगितलं … त्या दोघींना खाली उतरवलं.
पोलिसांशी त्या वकिलीण बाई बोलत होत्या. मुलींना बाकावर बसवलं होतं… इतरही आम्ही बऱ्याच जणी होतो… मुलींना वाटत होतं .. ‘ आई येणार आहे… बिचार्या ….आईची वाट पहात होत्या…
“आई कधी येणार ? आई कुठे आहे ?” असं सारखं विचारत होत्या. कितीतरी वेळ आम्ही तिथे होतो
आता या मुलींचं काय होणार… या विचाराची सुद्धा भीती वाटत होती. डोळे अक्षरशः आपोआप वाहत होते… आम्ही मूकपणे उभ्या होतो .
या मुलींना परत आई कधीही भेटणार नव्हती…. याचे आम्हाला प्रचंड दु:ख वाटत होते.
काही वेळानंतर दोन महिला पोलीस आल्या आणि मुलींना घेऊन निघाल्या.
त्या दोघी लांब जाईपर्यंत आम्ही बघत होतो ……
या मुलींचे भवितव्य काय असेल..
मुलींचा काय दोष…
मुली म्हणून सोडून दिल्या का…
मुलं झाली असती तर सांभाळली असती का ?
मग मुलींना का टाकलं?
… अनेक अनुत्तरित प्रश्न मनात उमटत होते….
या घटनेला इतकी वर्ष झाली तरी त्या मुली आठवल्या की माझे डोळे अजूनही भरून येतात.
आज कुठे असतील त्या मुली…..
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈