श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मी मतदार — भाग – ४ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

मी गोंधळलेला.

पु ल देशपांडे यांच्या ‘एक शून्य मी’ या पुस्तकातील ‘सत्तेच्या साठमारीत लोकशाहीचा बळी’ हा लेख खरंच सर्वांनी पुन्हा पुन्हा वाचावा. तो वाचल्यावर लक्षात येतं की राजकारणात साधन शुचिता ही पूर्वीपासूनच नाही. त्यामुळे कुठल्यातरी एका माणसाला पकडून त्या माणसाकडे साधन शुचिता नाही असा आरोप करणे ही गोष्ट हास्यास्पदच आहे. त्यात जातीयवादाचे विष गुंफून या राजकारणात आणखी एक विकृतीचा पैलू मिसळून विचार करणं हा आणखी वाईट प्रकारचा उपक्रम आहे. सध्या जातींचा उपयोग हा फक्त राजकारणासाठी आणि मतांच्या विभाजनासाठीच केला जातो. खरं म्हणजे राजकारणी माणसाची जात म्हणजे ‘राजकारणी’ मग त्याची जन्मजात कुठली का असेना, त्याचा उल्लेख हा गैरलागूच आहे. जोपर्यंत सध्याच्या पद्धतीचे राजकारण आहे. तोपर्यंत जातीअंताची लढाई कधीही यशस्वी होऊ शकणार नाही असे वाटण्याला नक्कीच वाव आहे. स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी इतर पक्षांची मोडतोड करणे फाटा फूट करणे शक्य असतील ते छोटे मोठे प्रादेशिक पक्ष शक्यतो नष्ट करणे किंवा गलितगात्र करणे हा उद्योग मागील कित्येक वर्षे चालू नाही असे कुणाला म्हणावयाचे आहे काय ? अभद्र युत्या किंवा आघाड्या बनविणे. कोणत्याही प्रकारच्या वैचारिक भूमिका जुळत नसतानाही सत्तेच्या साठमारीसाठी राजकारणाची तडजोड करणे हे तर आपण कित्येक वर्षे पाहतोच आहे. निदान मी तरी मागील पन्नास वर्षे पाहतो आहेच. महाराष्ट्राबद्दलच बोलायचे झाले तर अगदी शेका पक्षापासून ते शेतकरी संघटनेपर्यंत अनेक प्रादेशिक पक्ष आणि संघटना यांचे वाटोळे या राजकारण्यांनी केलेलं आहेच. आता नवीन लोक राजकारणामध्ये आले आहेत म्हणून त्यात काही बदल होण्याची शक्यता कशासाठी गृहीत धरायची ? आलेले लोकही कोणत्या जातीचे धर्माचे आहेत याचा विचार करून मतदारांनी किंवा इतर सर्वांनी त्यांच्याकडून काही वेगळ्या अपेक्षा ठेवायचेही काही कारण नाही. कधी कधी असेही वाटते की एखाद्याकडे चांगली धोरणे असतील तरीसुद्धा ती धोरणे राबविण्यासाठी सत्ता टिकवणे कोणत्याही मार्गाने का होईना पण आवश्यक आहे. ती सत्ता मिळवण्यासाठी साधनशुचितेचा उपयोग करून प्रामाणिकपणे सत्ता मिळवता येत नाही असेच सध्याचे चित्र दिसते. सत्ता मिळवणे व ती टिकवणे या गोष्टींची आवश्यकता धोरणे राबवण्यासाठी आहेच. पाच वर्षानंतर भाजप हा पक्ष जर पुन्हा निवडून आला नसता. तर 370 हटवणे व राम मंदिर बांधणे तसेच आणखी ज्या काही गोष्टी त्यांना धोरणात्मक पद्धतीने राबवणे आवश्यक होते त्या राबवता आल्या असत्या का ?

त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सत्ता टिकवणे अत्यावश्यक आहे आणि तो राजकारणाचा एक आवश्यक भाग आहे असे आता मतदारांनाही पटू लागले आहे. त्यामुळे आता राजकारणातील चमत्कार याला गलिच्छपणा किंवा चिखल म्हणण्यापेक्षा हा राजकारणाचा राजमार्ग आहे असे का म्हणू नये ? कारण स्वातंत्र्यानंतर हेच तर चालू आहे.

एक सामान्य मतदार म्हणून मला आता असेच वाटू लागले आहे.

अर्थात माझे वाटणे बरोबर की चूक हे मात्र मला समजत नाही. कारण

मी सर्वसामान्य मतदार,

पूर्णपणे गोंधळलेला,

आणि कन्फ्युज्ड !

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments