श्री सुनील देशपांडे
मनमंजुषेतून
☆ मी मतदार — भाग – १० ☆ श्री सुनील देशपांडे ☆
मी गोंधळलेला.
आत्तापर्यंतच्या एकूण नऊ लेखांपासून मी माझ्या मतदानाविषयीच्या गोंधळाबद्दल आणि कन्फ्यूजन बद्दल लिहिले आहे. या लेखाद्वारे एक अंतिम गोंधळ आपल्यासमोर मांडतो आहे.
आजची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहता जे दिसते आहे तीच परिस्थिती घटनाकारांना अपेक्षित होती का ? लोकशाही म्हणजे हीच परिस्थिती का ? तसे असेल तर आपल्याला खरेच लोकशाही योग्य आहे का ? नसेल तर आपण लोकशाही योग्य पद्धतीने राबवली नाही असे म्हणावे काय ? शेवटी लहान मुलाच्या हातात एखादे छान, कितीही चांगले आणि भारी खेळणे दिले तरी तो त्याची मोडतोडच करतो. त्याप्रमाणे लोकशाही संकल्पना ज्यांच्या मनामध्ये, वृत्तीमध्ये नीट रुजलीच नाही, त्यांच्या हातात घटनाकारांनी ही राज्यघटना देऊन, तसेच तर केले नाही ना ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीअंताची लढाई सुरू केली होती. आज ७५ वर्षाने जाती संघर्षाची लढाई आणि जाती विभाजनाची लढाई मोठ्या प्रमाणावर चालू आहे. हेच अपेक्षित होतं ? प्रजा हीच सार्वभौम ? खरंच तसं आहे ? सर्व समाज घटकांचा समतोल विकास, खरंच होतो आहे ? सर्वांना समान संधी खरच मिळते आहे ? शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व खरंच आज आहे ? समता आणि बंधूभाव हा कुठे दिसतो आहे ?
सत्तर वर्षांपूर्वीची लोकशाही बाबत पाहिलेली स्वप्ने आम्हालाही माहित आहेत. आमच्यापेक्षा पंधरा-वीस वर्षांनी मोठे असलेल्यांनी ती आमच्याही डोक्यात भरवली होती. त्या स्वप्नांचा चक्काचूर झालेला पाहताना आनंद होईल ?
अशीच परिस्थिती. मागील पानावरून पुढे चालू राहणार असेल तर …….
मी मत का द्यावं ?
मी मत द्यावं का ?
मी पूर्णपणे गोंधळलेला
आणि कन्फ्यूज्ड (?)
© श्री सुनील देशपांडे
नाशिक मो – 9657709640 ईमेल : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈