श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

उत्पादन, निगा आणि मशागत — ☆ श्री मकरंद पिंपुटकर

(Manufacturing, maintenance and cultivation)

माधव – पाचवीतला एक सत्शील मुलगा. हल्लीच्या मुलांत आढळतो तसा आक्रस्ताळेपणा क्वचितच त्याच्यात दिसे. माझी बायको आणि मी – आम्ही दोघेही त्याच्या आईवडिलांचे याबद्दल नेहमीच कौतुक करत असतो. आणि ते दोघेही नेहमीच त्यांच्या गुरूंच्या तसबिरीकडे बोट दाखवत “महाराजांची कृपा” म्हणत नम्रपणे ते कौतुक स्वीकारत असत. 

“यात महाराजांच्या manufacturing चं कौतुक आहे, आमचं काही त्यात श्रेय नाही,” अशी त्यांची यावर नेहमीची टिप्पणी असे. 

माधवचे आईवडील नव्या पिढीतले. तो इंजिनिअर, स्वतंत्र व्यवसाय, आणि व्यवसायानिमित्त अनेकदा फिरतीवर. तीसुद्धा इंजिनिअर – संगणक क्षेत्रातली. जरी work from home करत असली, तरी कधी जपान – हाँगकाँगचे clients, तर कधी युरोप अमेरिकेचे clients, त्यामुळे तिचा दिवस कधी अगदी पहाटे सुरू व्हायचा तर कधी अगदी मध्यरात्रीपर्यंत चालायचा. 

त्रिकोणी कुटुंब छान बहरत होतं.

एकदा माझ्या बायकोनं माधवला डझनभर “किंडरजॉय” चॉकलेटं आणून दिली. आणि त्याच्या आईला सांगून ठेवलं, “लेकाला सांगू नकोस हो. उगाच एकदम बकाबका खाऊन टाकायचा.”

त्यावर माधवची आई हसली आणि म्हणाली, “नाही, आमच्याकडे तो प्रॉब्लेम नाही. त्याच्यासमोर सगळी चॉकलेटं ठेवली, तरी तो एखाददुसरंच खाईल. त्याला नाही सांगावं लागत.”

काहीच न बोलता, मी नुसतं सहेतुकपणे तिच्याकडे पाहिलं, तिनंही नेहमीप्रमाणे महाराजांच्या कृपेला याचं श्रेय दिलं. 

“फक्त तेवढंच नाहीये,” मी यावेळी प्रश्न धसाला लावायचं ठरवलं होतं.  “एखाद्या गोष्टीचं उत्पादन manufacturing अतिशय छान असलं, तरी त्याची नीट निगा maintenance राखणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. मग ती मर्सिडीज गाडी असो किंवा मुलं…. लहान असताना छान असलेली मुलं आईवडिलांच्या अती लाडांनी बिघडलेलीही पाहिली आहेत, किंवा करिअरच्या नादापायी मुलांकडे झालेल्या दुर्लक्षाने ती वाया गेलेलीही पाहिली आहेत…. आणि तुमच्या बाबतीत तुम्ही नुसती त्याची निगा राखत नाहीत, तर त्याच्या चांगल्या गुणांची मशागतही cultivation करत आहात. त्याच्या चांगल्या गुणांची जोपासनाही करत आहात.” 

आणि हे खरंच होतं…

माधवचे आईबाबा त्याचे लाडही करायचे, पण त्याला लाडावून ठेवायचे नाहीत. ते कामात गर्क असतील आणि तो काही विचारत असेल, तर त्याला तसं समजावून सांगायचे, नंतर वेळ देऊ म्हणायचे. पण त्याचबरोबर माधवचं खरंच काही – तेवढंच महत्त्वाचं आणि तातडीचं काम असेल तर हातातलं काम बाजूला ठेवून त्याला मदतही करायचे. 

मुख्य म्हणजे ते त्याच्याशी संवाद साधायचे, या वयात असतात तशा त्याच्या निरनिराळ्या शंकाकुशंकांचं – अगदी राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत आणि शाळेतील इयत्ता पाचवीतील partiality पर्यंतच्या सर्व अगत्याच्या विषयांचे – ते मनापासून – न कंटाळता – न वैतागता – न चिडचिड करता निरसन करायचे. 

“तू गप्प बस, तुला काय करायचाय नसता चोंबडेपणा ?” किंवा “तू अजून लहान आहेस, मग मोठा झाल्यावर सांगू.” अशी उत्तरं द्यायचे नाहीत.

आज दुपारी जेवताना असंच झालं. मी कॉलेजला होम सायन्सला शिकवतो म्हणजे नक्की काय करतो असा माधवला प्रश्न पडला होता. मग होम सायन्स म्हणजे “घर कसं चालवायचं त्याचं सायन्स” अशी मी काहीशी बाळबोध व्याख्या केली, त्यावर “म्हणजे फक्त होम कसं चालवायचं ते शिकायला एवढा मोठ्ठा तीन वर्षांचा अभ्यासक्रम ?”  असा माधवचा पटकन् प्रश्न आला. 

त्याचं वाक्य पूर्ण होतंय की नाही त्याच्याआत, त्याच्या बाबांनी “थांब, थांब. फक्त होम कसं चालवायचं असं म्हणून अपमान करू नकोस.” असं म्हणत त्याला होम सायन्सचे कंगोरे समजावून दिले, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ‘घर चालवणं किती श्रेष्ठ आणि तेवढंच किचकट काम आहे’ हे माधवला समजावलं.  

त्याच्या आईनेही “बघ, मी किंवा आजी आजोबा घरी काम करताना कधी कधी चुका करतो, मग त्या चुकांतून आम्ही शिकत जातो. असं चुका करून शिकण्यापेक्षा त्याचा readymade तयार अभ्यासक्रम असेल तर किती छान ना ? म्हणजे आज्जी lifetime मध्ये जे शिकली ते इथं तीनच वर्षांत शिकता येईल,” असं सांगत, आणखी काही उदाहरणं देत होम सायन्सबद्दल माधवला माहिती दिली. 

त्यांना इतक्या उत्स्फूर्तपणे त्याला माहिती देताना पाहून मी आणि माझ्या बायकोने एकमेकांकडे पाहिलं. 

महाराजांच्या कृपेची निगा आणि मशागत छान सुरू होती. 

… आणि आम्हासकट सगळ्यांसाठीच तो एक आदर्श वस्तुपाठ होता. 

(सत्य घटना — आणि आज माधवच्या आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवसही आहे, हा एक सुंदर योगायोग.)

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments