सुश्री ज्योति हसबनीस

निसर्गायन 

(प्रस्तुत है  सुश्री ज्योति  हसबनीस जी  का प्रकृति पर  एक अतिसुन्दर आलेख।)

पाऊस पडून आकाश अगदी मोकळं झालेलं! स्वच्छ निळाईचं छत माथ्यावर, आजूबाजूला तृप्त हिरवाई, आणि संगतीला पाखरांची किलबिल! प्रसन्न सकाळ आणि तृप्त भंवतालाचा नजरेने आस्वाद घेत पावलं झपझप पडत होती.

साऱ्या बहराची भरभरून वाहणारी ओंजळ अनंत हस्ते रिती करून अतीव समाधानात अनंत उभा होता. बकुळ मात्र एखाद्या सम्राज्ञीच्या थाटात आपल्या ऐश्वर्याची मुक्त हस्ते उधळण करीत होती . कदंब दिवास्वप्न बघण्यात गढल्यासारखा भासत होता. आवडत्या झाडांवर मायेने नजर फिरवतांना कोण सुख होत होतं ! आणि तेवढ्यात चिरपरिचित ‘चीची’ जरा कर्कश्श आवाज कानी पडला ! नजर त्या दिशेने वळतेय तेवढ्यात झाडाच्या फांदीवरून ग्रे हाॅर्न बिल्सची जोडी मोठ्या डौलात आकाशात झेपावली ! निमिषार्धात दुसऱ्याही जोडीने त्यांच्या मागोमाग आकाशात झेप घेतली !

क्षणभर विश्वासच बसेना ! काय सुंदर दृष्य होतं ते ! मुक्त आकाशात आपल्या जोडीदाराबरोबरचा मुक्त विहार …! साथसंगत …जिवलगाची ..किती हवीहवीशी ! त्याच्या साथीने गगनभरारी घेण्यासाठी पंखात संचारणारं  बळ…त्याच्या संगतीने सारे ऋतू अंगावर घेण्याचं सामर्थ्य …बरोबरीने नवनव्या अवकाशाला घातली जाणारी गवसणी …! सहजीवनाचं सारच ती पक्ष्यांची जोडी नकळत सांगून गेली.

खरंच निसर्ग सा-या चरांचरांतूनच काही तरी सतत सांगत असतो, आपल्याशी संवाद साधत असतो ! निसर्गाची शिकवण ही अव्याहत सुरूच असते, उन्हाचे चटके सोसत तीव्र जीवनेच्छेने ग्रीष्मात तग धरून राहिलेली झाडं असू दे, की उन्हाचा चटका कमी करणारा, सुखवणारा मोगरा असू दे, की उन्हाच्या तडाख्यातही अंगांगी फुलणारा आणि सगळ्यांना खुलवणारा पळस, बोगन, गुलमोहोर असू दे, की पावसाच्या एका सरीतच उमलून आलेली लीली असू दे, की हातचं काहीही न राखता मुक्त हस्ते भरभरून देणारं झाड असू दे, किती आणि काय काय !!जगण्याची असोशी, जगण्याचं सार, जगण्याची कला सारं ह्या पठ्ठ्याला अगदी आत्मसात झालेलं !

मनोमन निसर्गाला मुजरा करत,  मनावर कोरल्या गेलेल्या दृष्याची उजळणी करत एका वेगळ्याच तृप्तीत पावलं घराकडे वळत होती !

© ज्योति हसबनीस, नागपूर

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments