मराठी साहित्य – मराठी आलेख – * संवाद मुका झाला * – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

संवाद मुका झाला

(प्रस्तुत है  कविराज विजय यशवंत सातपुते जी ते का e-abhivyakti में हार्दिक स्वागत है। पढ़िये श्री सातपुते जी का एक विचारणीय आलेख) 

 भावनांचा कोंडमारा
शब्दातुनीच वाहतो
व्यक्त मी, अव्यक्त मी
स्मरणात तुमच्या राहतो.
मनामध्ये व्यक्त अव्यक्त भावनांचा कोंडमारा सुरू झाला की, प्रत्येकाला आपल मन कुणाजवळ तरी मोकळं करावसं वाटतं. बर्‍याचदा समवयस्क व्यक्तींकडे असा संवाद साधला जातो. सुखदुःखाच्या अनुभूतींचे आदानप्रदान होते. एकमेकांना समजून घेऊन धीर दिला जातो. काही समस्या  असल्यास त्यावर चर्चा करून त्यातून मार्ग सुचवला जातो.  अनुभवाचे बोल या प्रसंगी  आपली कामगिरी चोख बजावतात.
संवाद साधला जात  असताना प्रत्येक वेळी समस्या असतेच असे नाही. समोर घडणार्‍या  एखाद्या वास्तवदर्शी घटनेवर सहज भाष्य करता करता संवाद साधला जातो. वादासह संक्रमित होणारा संवाद ही मतपरिवर्तन घडवू शकतो. संवाद हा प्रत्यक्ष बोलाचालीतून, वाचनातून, लेखनातून, साहित्य निर्मिती मधून, तसेच नृत्य, नाट्य, कला,क्रीडा, यांच्या अविष्कारातून साधला जाऊ शकतो. विद्या आणि कलेच्या व्यासंगातून साधला जाणारा संवाद प्रत्येकाला कार्यप्रवण राहण्यास प्रेरक ठरतो .
आपल्या देशात आपण अनेकविध स्वातंत्र  अबाधितपणे उपभोगत असतो ,त्यामुळे कुणी,कुठे, कधी, कुणाशी, कसा संवाद साधायचा हे व्यक्तिसापेक्ष आहे. हा संवाद साधत असताना, त्यातून घडणार्‍या क्रिया, प्रतिक्रिया, परिणाम, सर्वप्रथम त्या व्यक्तीवर, कुटुंबावर,समाजावर, गावावर, शहरावर, देशावर आणि तरी संपूर्ण जगतावर होत  असतो.
” संवाद मुका झाला ” , या वाक्याचा अर्थ संवादाचे स्वरूप बदलले आहे,  असा घ्यायला हवा. सोशल नेटवर्किंग, मिडीया चा वापर मोठय़ा प्रमाणावर होत आहे. ही गोष्ट नाकारून चालणार नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने, आपल्या  आवडीनुसार, सोशल मीडियाचा उपयोग करीत संवाद साधत आहे. विचारांची देवाणघेवाण होत आहे. ..’घरात विचारत नाही कुत्रं,पण फेसबुक वर हजारो मित्र ‘.. हे वास्तव नाकारता येत नाही. लेखनातून, वाॅटस अपच्या माध्यमातून संवाद होतो आहे.
कुटुंबात, नात्यांमधे, प्रत्यक्ष बोलाचाली नसली तरी मोबाईल, स्मार्ट फोन मधून संपर्क  साधला जातो  आहे. मतभेद झाले की मनभेद होतात. मने दुखावली, की ,मनात अढी, किंतू, किल्मिष, घृणा,द्वेष, मत्सर, असूया  उत्पन्न होऊन नाती दुरावतात. नाती कायमची दुरावण्यापेक्षा मोजका, गरजेनुसार आवश्यक संवाद सोशल मीडिया द्वारे  आज होत आहे. नात्यात अंतर राखून नातेसंबंध टिकवले जात आहेत.
संवाद साधताना  उपयोगात येणारा फोन, भ्रमणध्वनी बनला असून तोच हा मुका संवाद साधत आहे. हरिपाठ, अभंग, शुभंकरोती, भजन, कीर्तन,   अंगाई, सारं संस्कारित वाड़्मय (मोबाईलची ) कळ दाबताच उपलब्ध होत आहे. बाप-लेक , दोन पिढ्यातिल संवादही लोकल न राहता ‘सोशल ‘बनला आहे. रोज नियमित पेपर वाचून, चर्चाचर्वण करणारा ज्येष्ठ नागरिकही या सोशल नेटवर्किंग संवादातून  ‘ग्लोबल’ झाला आहे. साठ सत्तर वर्षापूर्वीचा बालपणीचा सखा सोबती या माध्यमातून घरबसल्या संवाद साधू शकतो.
समोरासमोर प्रत्यक्ष संवाद साधताना, त्या व्यक्तीचा चेहरा ही,न बोलता बरच काही बोलून जायचा. पण हा मुका संवाद,माणसाला  माणूस ओळखायला, माणूस जोडायला शिकवायचा. आता लेखी पुरावा असतानाही,  ‘अरे माझ्या मनात तसं नव्हते, ते बोल माझे नव्हते, फाॅरव्रडेड मेसेज होता’, असे सांगून वेळ मारून नेली जाते.
‘संवाद मुका झाला ‘याचा जितका फायदा झाला, तितका तोटा ही ,मावळत्या पिढीला सहन करावा लागला. डोळ्यातून बोलणारा माणूस,आता  शब्दातून बोलतो आहे.  रागातून, धाकातून व्यक्त होणारा माणूस  आचार, विचार, आणि कृतीतून व्यक्त होत आहे. ठराविक गोष्टीसाठी विशिष्ट व्यक्तींवर  अवलंबून राहणारा माणूस या मुक्या संवादाने  अक्षर ब्रम्हांडाशी जोडला गेला आहे.   माणूस माणसाशी जोडला जाण्याचं महत्त्वपूर्ण कार्य ‘संवाद ‘साधत  असतो.
संवाद मुका असो वा बोलका,  ”या ह्रदयीचे त्या ह्रदयी विचारधन संक्रमित होते आहे”  माणूस माणसाच्या संपर्कात आहे, मतपरिवर्तन होते  आहे हे माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचे आहे. .

© विजय यशवंत सातपुते, यशश्री पुणे. 

मोबाईल  9371319798