मराठी साहित्य – मराठी आलेख – * कुठलाही निर्णय घेताना मुलांना विश्वासात घ्या * – सुश्री रंजना लसणे

सुश्री रंजना लसणे 

कुठलाही निर्णय घेताना मुलांना विश्वासात घ्या

(आदरणीया सुश्री रंजना लसणे जी के शिक्षिका/लेखिका हृदय का अभिनंदन।  इस अत्यंत शिक्षाप्रद एवं हृदयस्पर्शी कथा के लिए सुश्री रंजना जी को सादर नमन)

जून महिना म्हणजे प्रवेशाची गडबड नवीन येणाऱ्या मुलांची ओळख करून घेणे, त्यांच्या आवडी निवाडी जाणून घेणे, एकदम उत्साहाचे वातावरण, मी मुलांशी छान गप्पा मारत होते  एवढयात  एक नवीन विद्यार्थी प्रवेश झाला. नाव ऋषीकेश नावा प्रमाणे  दिसायला सुंदर  गोरागोमटा स्मार्ट  अभ्यासातही चांगला  होता. पाहताच मनात भरावा असं व्यक्तीमत्व, वरकरणी पाहता सर्व काही ठीकठाक वाटायचे, परंतु  दिसतं तसं अजिबात नव्हते. मुलांच्या रोज नवीन तक्रारी,  “मेम याने मला मारलं”. कधी दगड कधी छडी तर कधी लाताळी, बर विचारलं तर एकही शब्द न बोलता गप्प उभा राहायचा समजावून पाहिलं  चिडून पाहिलं एकदोन वेळेस  मारून ही पाहिलं. मुख्याध्यापकांकडे नेऊन टी.सी. देईन असे सांगितले, परंतु काहीच बदल  नव्हता.

एक दिवस तर त्याने एका मुलाचं चक्क  दगड मारून डोके फोडलं. मला या मुलाचं काय करावं खरंच कळत नव्हतं  तीस वर्षाची नोकरी करून मला एका मुलाला समजावून सांगता येतं नव्हतं. मी पुरती हतबल झाले होते. घरच्यांना सांगून पाहावे म्हणून, मुलांना पाठवून “त्याच्या घरून कोणालातरी बोलावून आणा,” असे सांगितले. मुलानी त्याच्या काका म्हणजे मावशीचा नवरा, यांना बोलावून आणले. बहुतेक येताना मुलांनी  काय घडले ते सांगितले असावे.

शाळेत आल्याबरोबर त्यांनी तोंडाने अर्वाच्य शिव्या देत हातातल्या  छडीने बेदम झोडपायला सुरूवात केली. मला ते पहाणे असह्य होऊन “आहो, सोडा त्याला ही काय पद्धत झाली समजावून सांगण्याची, ” म्हणत मी चक्क त्याला त्यांच्या तावडीतून सोडवून घेतले . आणि त्यांना

जायला सांगितलं.  “माजलाय साला,” म्हणत तावातावात ते निघून गेले अन्  मला चक्क चपराक मारल्यासारखं झालं. “सॉरी बेटा” म्हणून त्याला जवळ घेताच, एवढा वेळ मुकाटयाने मार खाणाऱ्या ऋषीला भरून आलं आणि चक्क  मला घट्ट घरून एवढा रडला की अक्षरशः पूर्ण वर्ग रडला.

जवळजवळ पंधरा वीस मिनिटांनी तो शांत झाला.  बाकी मुलांना बाहेर पाठवून त्याची चौकशी केली तेव्हा कळलं की, खरं तर त्याला एकट्या आईला पुण्याला सोडून इथं राहायचं नव्हतं.

त्याचे वडील  सहा महिन्या पूर्वी लाईटचे काम करताना शॉक लागून मरण पावले. आई मामाकडे पुण्याला राहते मामा मामी पण काका सारखेच वागायचे. आई आणि बहिणी यांचे हाल त्याने पाहिलेले होते. दोन मोठ्या बहिणी आई एवढे एकत्र शिवाय याच्या  शिक्षणाचा खर्च एवढे  एकाच ठिकाणी नको म्हणून मावशी उदार अंतःरणाने याला घेऊन आलेली. परंतु सर्वांनी असं अलग अलग राहावे  हे त्याला मान्य  नव्हते . तसेच त्याला आई आणि बहिणींची   काळजी वाटत होती.  “तू नकोस काळजी करू, मी तुझ्या  आईशी नक्की बोलेण, पुढच्या वर्षी तुम्ही नक्कीच एकत्र राहाल, असे मधेच पुण्याच्या शाळेत तुला कोणी घेणार नाही तुझे वर्ष वाया जाईल पुन्हा चौथीत बसायला तुला आवडेल का ? ”  असे म्हटल्यावर त्याला चे पटले . मी आईला सांगते असे म्हणताच तो खूष झाला . चॉकलेट खाऊन खेळायला गेला  आईचा नंबर मिळवून   त्यांना, “ताई, बाळापूरला  आल्यानंतर मला भेटा आणि तो छान अभ्यास करत आहे,” असे ही सांगितले. हे सर्व सगळ्या मुलांच्या  समोर घडल्यामुळे मुलांनी त्याची तक्रार करणे  नुसते बंद  केले असे नाही, तर तो नेहमी  खूष कसा राहील यासाठी ती सारी न सांगताच प्रयत्न करू लागली . वर्षभरात अप्रतिम  अभ्यास केला, एवढेच नव्हे, तर काका सोबत राहून दाढी कटिंग चे कामही शिकला. त्याच्यातील हा बदल पाहून मलाही समाधान वाटलं मधेच दोनचार वेळा तू पुढच्या वर्षी माझ्याकडे राहातोस का विचारलं परंतु स्वारी जागेवरच अडलेली. शेवटी  त्याच्या आईलाच मी घडलेला सर्व प्रकार समजावून सांगितला, ” ताई कुठेही राहिलात तरी काम तर करावेच लागणार कुणीही सगळ्या कुटुंबाला बसून खाऊ घालणार नाही, मग सगळेच गावी राहा सासरच्या लोकांशी गोड बोलून त्यांची मदत घ्या त्याच्या आधाराने जमलं तर एकत्र किंवा वेगळं का असेना राहा. तुम्हाला त्यांची  मदतच  होईल तिथेच राहून काम बाहेर करण्या पेक्षा त्यांची कामे करा, हेही दिवस जातील.” त्यांनाही ते पटले असावे कांही दिवसातच  त्या राहायला गावाकडे आल्या आणि सगळं व्यवस्थित झालं.

चौथी पास झाल्यावर  सुट्टी नंतर तो परत आला तेव्हा म्हणाला, “आम्ही सर्वजण आमच्या गावीच राहतो. आम्हाला  असलेली शेती  करतो मीही सुट्टीत आणि सकाळ- संध्याकाळी दुकानात काम करून  आईला मदत करतो.” असे सांगताना  त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात होता.

त्याचे गाव जवळच असल्यामुळे आला की भेटतो “आजी काका पण मदत करतात, ” असे सांगत असतो.

तात्पर्य : एखाद्या निर्णय जरी आपण तो त्यांच्या भल्यासाठी घेत असलो तरीसुद्धा तो घेताना मुले लहान आहेत म्हणून त्यांना गृहीत धरण्यापेक्षा त्यांच मत सुद्धा विचारात घेणे आवश्यक असते. अन्यथा त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही.

*रंजना लसणे .*

आखाडा बाळापूर

9960128105