मराठी साहित्य – मराठी आलेख – * विषवल्ली .. . ! * – डॉ. रवींद्र वेदपाठक

डॉ. रवींद्र वेदपाठक

विषवल्ली .. . !

(डॉ. रवीन्द्र वेदपाठक जी का e-abhivyakti में स्वागत है। डॉ वेदपाठक जी का यह लेख हमें  राष्ट्रीय एवं सामाजिक उत्थान के लिए सकारात्मक दृष्टिकोण से  विचार करने के लिए बाध्य करता है।)

आपल्या भारत देशासारख्या खंडप्राय विकसनशिल देशाला *जात* ही एक लागलेली किड आहे. तीची सुरुवात किंवा आपण त्याला उत्पत्ती म्हणु शकतो, तर ही कशानेही *”न जाणारी जात* कोठुन उत्पन्न झाली त्याचं मुळ शोधणं खुप अवघड आहे. आणी आजच्या लेखाचं ते प्रयोजनही नाही..

आजचा विषय जरा वेगळा आहे, विषय डोक्यात येण्याचं कारण म्हणजे, मी सध्या एक फ्लँट  विकत घेण्याचं नियोजन करतोय, मला हवा तसा तळेगाव मध्ये हवेशीर असावा अशी इच्छा, म्हणुन मग नव्यानेच ओळख झालेल्या एका मित्राने नाव सुचवले म्हणुन मी एके ठिकाणी फ्लँट पहायला गेलो. मित्राने सांगीतलेच होते…. अरे आपलाच आहे, पाहुणाच आहे नात्याने….. जावुन ये.. म्हटलं चला आपला माणुस म्हटलं की कुठेतरी विश्वास असल्यासारखं वाटतं.

मग मी सकाळीच गाडी काढली आणी नविनच सुरु असलेल्या साईटवर गेलो, साईटच्या बाजुलाच एका शेड मध्ये ए.सी. केबीन मध्ये ऑफिस होते.

मित्राने आधीच ओळख करुन दिली असल्याने स्वागत चांगलेच झाले….. या या डॉक्टर साहेब… बसा, असे सगळंच अगत्यपुर्वक चालु होते.

सगळा स्टाफ नविनच दिसत होता, मला त्यांनी त्यांची ओळख पण करुुन दिली, मी पण थोडसं समाजाचं, जातीचंच सामाजिक काम करत असल्याने,  तो सुध्दा मला इंम्प्रेस करण्यासाठी सांगु लागला.

कसं आहे ना, डॉक्टर…. मी माझा सगळा स्टाफ आपल्या जातीतलाच भरलाय, हा बघा माझ्या लांबच्या आत्याचा नातेवाईक, तो मामेबहीणीच्या सासरच्या पाहुण्यांचा, असे आपलेच लोक असले म्हणजे काम विश्वासाने होते, दगाफटका रहात नाही, आणी आपल्याच माणसांनी चार पैसे कमविले तर बिघडले कोठे ?

मला पण ते पटले, पण तरीही एक शंका मनात आली म्हणुन विचारली….

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण सरकारी नियमानुसार जातीनिहाय आरक्षण असावे लागते ना ?

आमची चर्चा जरा वेगळ्याच विषयाकडे वळली…..

हो ना डॉक्टर, पण तुम्ही बघा, सगळेच तर तसे करतात, प्रत्येक जण, प्रत्येक व्यावसायिक आज आपल्याच लोकांना काम देण्याचा विचार करतोय, व देतोय, त्याने दोन फायदे होतात आपल्या जातीत आपल्या समाजात आपल्याला किंमत मिळते, सामाजिक कार्य केल्याचे पुण्य मिळते, आणी मुख्य म्हणजे विश्वासू माणसे मिळतात.,  त्याने त्याचा मुद्दा क्लिअर केला…

मी पण, ते मान्य करुन खरेच यातुन आपल्या जातीची, समाजाची भरभराट होतेय म्हणुन त्यास दुजोरा दिला, व घरी परतलो.

पण हे विचार डोक्यातुन जात नव्हते, हे योग्य कि अयोग्य, सरकारी नियम आहे, नोकरी देताना जातीनिहाय आरक्षण देवुन नोकर भरती करावी, तरीही सरकारी क्षेत्रे सोडली तर आज कित्येक खाजगी कंपन्या किंवा कार्पोरेट जगत आपण म्हणू शकतो अशा ठिकाणी प्रत्येकजण स्वताच्या जातीच्या माणसांना, जवळच्या नातेवाईकांना चिकटविण्याचा प्रयत्न करीत आहे.…

*हे कितपत योग्य आहे….* कार्पोरेट जग जरी सोडून दिले तरी प्रत्येक व्यक्ती आज विचार करतेय कि माझ्यामुळे माझ्याच कुणाचा तरी फायदा व्हावा…..  मला काही खरेदी करायची आहे तर, माझ्याच समाजाच्या व्यक्तीकडुन मी तो व्यवहार पुर्ण करावा…..

आज आपला भारत देश ज्या संक्रमणातुन जात आहे, जिथे आज जातीय दंगली, जातीयवाद, आरक्षण वेगवेगळ्या जातींचे संप व मोर्चे असे प्रकार आहेत, तिथे आता प्रत्येकजण पोटजातींचा विचार करु लागलाय.

असा विचार करणे योग्य कि अयोग्य, मोठमोठ्या कंपनीमध्ये सुध्दा आजकाल सरसकट हा विचार होतो, जो कुणी चेअरपर्सन असेल त्याच्या मर्जीतील लोकांना जातीतील लोकांना काम देण्याचे प्रमाण वाढत चालले आहे….

जर भारत देश सोडला तर इतर कोणत्या विकसीत देशात जातींचे एवढे स्तोम वाढलेले दिसत नाही, जाती आहेत, पण त्या उच्चनिच दाखवण्यासाठी नाहीत, आपल्या देशात मात्र जातीवरुन लायकी ठरवली जाते.

हा जातीवाद एक विष बनुन संपुर्ण देशाला हळुहळु पोखरत आहे.

एक सुभाषित आहे…. *जर तुझे कर्म महान तर तु महान* 

आणी याला इतिहास साक्षी आहे, आजपर्यंत कोणतीही व्यक्ती जात श्रेष्ठ आहे म्हणुन महान बनली नाही…….. शिवाजी राजे मराठे होते म्हणुन राजे नव्हते…. ते त्यांच्या पराक्रमाने राजे होते… महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, विनोबा भावे, सरदार पटेल,  किंवा अगदी कपिल, सचिन, धोनी हे सगळे त्यांच्या जातीमुळे महान न्हवते, तर ते महान झाले कर्तुत्वाने. आणी तरीही आपल्या भारतात जातीच्या धर्माच्या गोष्टी सांगुन  स्वताला श्रेष्ठ समजतात. अरे या लोकांना कळत नाही का? स्वता प्रभु श्रीराम सुर्यवंशी या उच्च जातीचे असुन त्यानी शबरीची उष्टी बोरे खाल्ली., अरे या हिंदू संस्कृतीचे रक्षण कसे करायचे.

नक्कीच मला जो प्रश्न पडलाय, त्याचे उत्तर देणारे मला नक्कीच भेटतील नव्हे अगदी पटवुन देणारे भेटतील. पण यातुन जी विषवल्ली पेरली जातेय, ज्या वाईट चालीरीतींचा उदय होतोय, स्वताची जात व दुसऱ्याची जात असा भेदभाव निर्माण केला जातोय….. त्यातुन आपण कोणत्या अंधाराकडे ढकलले जातोय… याचा विचार कधी करणार, आतापर्यंत दोन चार धर्मांमधील धार्मिक तेढ होती, ती आता अठरापगड जातींच्या उंबऱ्यावर येवुन ठेपली आहे… तिच्याकडे किती दिवस कानाडोळा करायचा. माणुसकी मानवता हे शब्द आता फक्त पुस्तकातच वाचायचे का ?

कुणी असा विचार करु लागला तर त्याला गप्प बसविणारेच खुप भेटतात…..

पण खरेच व्यावायिक जगतात जो जातीवाद चालु झाला आहे त्याला कोण रोखणार.. कसे रोखणार.., आपल्याच जातीच्या लोकांची भरती करायची, फक्त त्यांनाच प्रमोशन मिळाले पाहीजे असा विचार करायचा… हे कुठेतरी थांबले पाहीजे…

अरे नुसतेच म्हणायचे, विविधतेने नटलेल्या,  अनेकात एकता असणारा माझा भारत….. अनेकात एकता नाही…… सात रंगांचे सुध्दा आता पोटरंग झालेत गुलाबी, बेबी गुलाबी,  रोझ गुलाबी…, आणी तसेच जातींचे सुध्दा झालेय…. पोटजाती.

कधी थांबायचं हे सारे, आहे काही उपाय ?

 

© डॉ. रवींद्र वेदपाठक

तळेगाव

Mob. No. :- ९००४३६३८७३

Email :- [email protected]

(इस लेख में उल्लिखित विचार लेखक के व्यक्तिगत विचार हैं। )