मराठी साहित्य – मराठी आलेख – * सून…? सून…?…..कसमसे ! * – सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

* सून…? सून…?…..कसमसे ! *

(ज्येष्ठ मराठी साहित्यकार सुश्री प्रभा सोनवणे जी  का e-abhivyakti में स्वागत है।  सास-बहू के सम्बन्धों पर आधारित सुश्री प्रभा सोनवणे जी का यह  विनोदपूर्ण आलेख निश्चय ही आपका हृदय प्रफुल्लित कर देगा।)  

सासू सुनेचं नातं हे एक अजबच रसायन आहे! दोघींच्या एकमेकींकडून असलेल्या अपेक्षा कधीच पूर्ण होत नाहीत!

सगळ्यात प्रथम माझ्या नजरेसमोर येते माझी आजी (आईची आई) कोकणात आजी आजोबा गावाकडे रहायचे आजोबा नोकरी तून सेवानिवृत्त झाल्यावर शेती करायचे. …आजी आजोबा दोघेही सुशिक्षित! अगदी देवमाणसं !

सूना मुंबई ला असायच्या त्या ही सुशिक्षित घरंदाज…पण त्यांच्या मध्ये कधीच सुसंवाद घडलेला मला आठवत नाही…कर्तव्य केली त्यांनी  ..पण खुप सुंदर खेळीमेळीचे संबंध असायला काही हरकत नव्हती…पण एक अंतर जाणवायचंच त्या नात्यात!

एकदा मामांच्या पायाला काहीतरी झालं होतं ते आजी ला दाखवत होते …आजी म्हणाली “रिंग वर्म म्हणतात त्याला!” यावर आजी तिथून उठून गेल्यावर मामी म्हणाल्या,”इंजिनिअर मुलाला आई इंग्रजी शिकवतेय”!

सासू ची टर उडवणं हा सगळ्या सूनांचा आवडता विषय असावा!

दुसरी सासू म्हणजे इकडची आजी वडिलांची आई त्या अशिक्षीत होत्या, पण स्वतःची सही करायला शिकल्या होत्या. त्या अंगठा द्यायच्या नाहीत सही करायच्या “कलावती शंकरराव जगताप” सूनांनाही अहो जाहो म्हणायच्या पण सूनांशी त्यांचंही फारसं पटलं नाही!

एकदा त्या स्वतःशीच बोलत होत्या,” तशाच पडल्या चतुर,एक ही नको आवडायला आणि निवडायला…सगळ्या सारख्याच” हे त्या सुनांविषयी बोलताहेत हे मला समजलं होतं!

माझ्या सासूबाईंशी ही माझं फारसं पटत नव्हतं पण माझ्या विषयी त्यांच्या मनात सॉफ्ट  कोर्नर आहे हे जाणवायचं!

आज समवयस्क मैत्रिणी जमलो की सूनांचा विषय निघतोच!

सून हा प्रत्येकीचा जिव्हाळ्याचा विषय पण त्या नात्यात जिव्हाळा असत नाही ही खंत!

माझी एक मैत्रीण  खुप कामसू, सुगरण, गृहकृत्यदक्ष, आणि कर्तृत्ववानही! सून नोकरी करते, ही घरात चविष्ट स्वयंपाक बनवते, नातवाला सांभाळते!

पण सून कधीच कुठला पदार्थ छान झालाय म्हणत नाही..कृतज्ञता व्यक्त करत नाही!

मी म्हटलं सोडून द्यावं, “ती म्हणो न म्हणो आपल्याला माहित आहे ना आपला स्वयंपाक चांगला होतो ते! आणि नावाजणारे इतर आहेतच की!”

मला आठवलं, आमच्या सरांच्या पत्नी एकदा जोगेश्वरीच्या  देवळात भेटल्या होत्या….खुप वर्षा पूर्वीची गोष्ट आहे! त्या म्हणाल्या, “टीव्ही पहात असले की सून टीव्ही बंद करते. काही बोलायला गेलं की ती बोटांनी ओठ बंद करते, बोलू नका म्हणत!” मग मी दुपारी देवळात येऊन बसते! ऐकावं ते नवलच ना!

असे अनेक किस्से आणि कहाण्या हे नातं इतकं बदनाम झालंय की काही विचारू नका! यात सासवांची काही चूक नसेल असं मला वाटत नाही….पण आजकाल च्या करिअर करणा-या सूनांनी तर हे समजूनच घ्यायला हवं, पाळणाघर तर आहेच पण नातवंडांना आजी ची माया ही हवी असते!

ब-याच सासवा व्यथित असतात आणि सुसरीबाई सुसरीबाई तुझी पाठ मऊ म्हणून साजरं करत असतात. या सर्व चर्चेत असं ही लक्षात आलं की, आपल्या आई पेक्षा सासू कितीही चांगली असली तरी माझी आई किती सुपिरियर आहे (नसताना) हे भासविण्याकडे मुलींचा कल असतो.  आणि हल्ली मुलींच्या हातात कायद्याचं शस्त्र ही आलंय, महिला सुरक्षा कायद्याचा गैरवापरही होतोय.

खरं तर किती सरळ साधं आहे हे नातं पण खुप अवघड होत जातं. वर्षानुवर्षे हे असंच चाललंय !

या मुली नव-या मधल्या शंभर कमतरता दाखवतील पण स्वतःविषयी अवाक्षर ही ऐकून घ्यायला तयार नसतात.

कधी कधी वाटतं हे नातंच असं आहे तर त्याकडून वेगळ्या अपेक्षा का करायच्या? सासू सूनांना एकमेकांविषयी प्रेम नसतं असं नाही….पण नेमकी कुठे माशी शिंकते कळत नाही.

एका मैत्रिणी कडे गेले होते तिची सून नुकतीच वेगळी रहायला लागली आहे. ती त्या  दुःखात मी तिला म्हटलं जाऊ दे…प्रत्येकाला स्वातंत्र्य हवं असतं…लांब राहून च चांगले संबंध रहातात! तिचं सून पुराण चालू असतानाच तिची सून दारात हजर!

आल्या आल्या तिनं सासूवर शब्दांचा भडीमार करायला सुरुवात केली. कुठे कुठे. काय काय जाऊन सांगता हो माझ्या विषयी, तुमची काय लायकी आहे मला माहित आहे! अर्धा  तास ती अखंड बोलत होती…सासू गप्प!

मला एक जुनं गाणं वेगळ्या अर्थाने म्हणावंसं वाटत होतं….

सुन… सुन …कसमसे लागू तेरे कदमसे …..तू चली जा…..

      पण आम्ही दोघीही त्या तोफेच्या तोंडी…मूग गिळून गप्प !

ती गेल्यावर मी फक्त एवढंच म्हणून मैत्रीणीचा निरोप घेतला —

सून? सून  ??……आई शप्पथ  !!

त्या नंतर आठच दिवसांनी मी रिक्षाने मसाप त जात असताना मला त्या दोघी पु.ना.गाडगीळ सराफांच्या दुकानात शिरताना दिसल्या!

 

© प्रभा सोनवणे

पुणे