मराठी साहित्य – मराठी आलेख – * माझ्या अंगणातील पऱ्या * – सुश्री रंजना लसणे

सुश्री रंजना लसणे 

*माझ्या अंगणातील पऱ्या*

(आदरणीया सुश्री रंजना लसणे जी के शिक्षिका/लेखिका हृदय का अभिनंदन।  इस अत्यंत शिक्षाप्रद एवं हृदयस्पर्शी आलेख के लिए सुश्री रंजना जी को सादर नमन)

कन्या अभिमान  दिना निमित्त सर्वांच्या कविता कथा लेख वाचले आणि तीस वर्षा पूर्वीचे दिवस आठवले. पहिल्या मुला नंतर एक गोजिरवाणी परी आयुष्यात यावी आपल्याला अवगत सर्व कलागुणांनांनी एक संपन्न आपली प्रतिकृती निर्माण करावयाची खूप इच्छा होती आपल्याला मुलगी या कारणामुळे ज्या गोष्टी करण्यापासून वंचीत राहावे लागले ते सर्व काही तिला भरभरून द्यायचं होते .परंतु पुन्हा नशीबानं कलाटणी दिली याही वेळी मुलगाच झाला. मन खट्टू झाले परंतु त्याच क्षणी ठरवलं आपल्या भोवती बागडणाऱ्या या सोनपऱ्या आपल्याच समजून वागायचं.

जेव्हा आपण एखाद्याला मनापासून आपलं मानतो तेव्हा त्याची सर्वस्वी जबाबदारी आपलीचं ठरते सातवी पर्यंत आणि तीही कन्या शाळा असल्यामुळे शेकडो चिमण्याची चिवचिव दिवसभर असायची, काहीजणी तर अगदी रात्री अंधार पडे पर्यंत घरीच असायच्या.

लहानपणी आई अनेक गोष्टी साठी का रागवायची हे आता समजायचं. आपल्या चिमणीवर कुणाचीही वाईट नजर पडू नये हा त्या मागचा मुख्य उद्देश तेव्हा कळायचा नाही आईचा रागही यायचा परंतु आता मात्र माझ्यातली आईचं जागी व्हायची. तसं आमचं बालपण लाडात परंतु कडक शिस्तीत गेलेले असल्यामुळे आईची तीच करडी जरब माझ्यात नकळत डोकावत असे. मुलींचा लाड ही खूप करायची परंतु शिस्त मोडली की सगळं बिघडायचं. मुलीही मला राग येणार नाही याची कटाक्षाने दक्षता घ्यायच्या. कधीकधी वाटायचं आपण हुकूमशाही पद्धतीने वागतो का?

एकदा कॉलेजमध्ये असणाऱ्या सहासात मुली कुठल्यातरी कार्यक्रमाला जाण्यासाठी अगदी नटून थटून निघाल्या होत्या. खूप सुंदर दिसत होत्या गप्पांच्या नादात त्यांनी मला जवळ येईपर्यंत पाहिलं नाही अचानक एकीचं लक्ष गेलं आणि सगळ्याजणी चक्क जवळच्या दुकानात शिरल्या लिपस्टिक पुसलं केस आवरले. आणि खाली मान घालून निघून गेल्या त्या दिवशी मला खरंच खूप वाईट वाटलं. आज पासून रागवायचं नाही पक्कं ठरलं. या घटनेने  नकळत सुखावले सुद्धा. शिक्षण पूर्ण झाल्यावर सुद्धा आपला शब्द मुलं जपतात यातचं खूप काही जिंकल्यासारखं वाटलं. यापुढे मुलींना रागवायचं नाही असं मनोमन ठरवलं परंतु व्यर्थच माझी छाप ठरली ती ठरली.

आजही लग्न झालेल्या मुली माहेरी आल्या की आवर्जून घरी येतात काही तर घरी बैग टेकली की थेट इकडेच निघतात. काही जावई स्वतःच आणून सोडतात. अगदी धन्य झाल्या सारखं वाटतं. आपल्याला मुलगी नाही ही सलं कुठल्या कुठं पळून जाते. ज्यांना मुली आहेत त्यांना मी तेव्हा का रागवायची ते प्रकर्षाने जाणवतं. त्या जेव्हा मोकळेपणानं हे कबुल करतात तेव्हा आपण हुकुमशाही पद्धतीने वागून चूक केली ही सलं सुद्धा आनंदात बदलते.

माझ्या दोन सुनबाई सोनपावलांनी येतील तेव्हा येतील परंतु आजही मी अनेक सोनपऱ्यांची  परिपूर्ण आई असल्याचे सुख नक्कीच अनुभवत आहे.

आज कन्या अभिमान दिनाच्या माझ्या सर्व कन्यकांना हार्दिक शुभेच्छा 

      कळत नकळत दुखावल्या बद्दल दिलगिरी व्यक्त करते

आपली ….

रंजना मधुकर लसणे

© रंजना लसणे
बाळापूर आखाडा,  हिंगोली मो. -9960128105