मराठी साहित्य – मराठी आलेख – ? मी एक मनस्वी ? – सुश्री प्रभा सोनवणे
सुश्री प्रभा सोनवणे
(सुश्री प्रभा सोनवणे जी हमारी पीढ़ी की एक ज्येष्ठ मराठी साहित्यकार हैं । उनका यह संस्मरण आलेख/संस्मरण निश्चित ही हमारी समवयस्क पीढ़ी को अस्सी के दशक के दिन याद दिला देगा। )
मनस्वी, अविचाराने, अव्यवहार्य असं मी अनेकदा वागलेली आहे.
आई वडिलांची भीती वाटायची, धाक होता. खरंतर चाकोरीबध्द आयुष्य असायला हवं होतं, पण मी चाकोरी बाहेरचे अनुभव घेतले,आठवीत असताना मुली म्हणाल्या कुठेतरी सहलीला जाऊ, एक मैत्रीण म्हणाली, “हिच्या शेतावर जाऊ” – म्हणजे माझ्या, आई परवानगी देणं शक्य नव्हतं, मैत्रिणीच्या शेतावर, जवळच जाणार असं सांगितलं, आमचं गाव, शेत पंधरा किलोमीटर होतं, एसटी नं जावं लागणार होतं जवळ कंपासबॉक्स साठी वडिलांनी दिलेले पैसे होते ते खर्च केले, ट्रीप चा आनंद घेतला, सहाजणी गेलो होतो, सहल छान झाली, त्या सहलीवर आशा देव नावाच्या आमच्या मैत्रिणीने कविताही केली, अर्थातच संध्याकाळी आईला समजलं, बोलणी खावी लागली, पण एक वेगळा अनुभव घेतला! लग्न अतिशय जुन्या मताच्या घरात झालं, हातात बांगड्या, डोक्यावर पदर! मैत्रिणीबरोबर ब्युटीपार्लर मध्ये गेले तिथे ब्युटीशियन म्हणाली, कुरळ्या केसांसाठी बॉयकट बेस्ट, मैत्रीण म्हणाली तिच्या घरी चालणार नाही!पण मी एक दिवस जाऊन बॉयकट करून आले, पण स्ट्रीक्टली डोक्यावर पदर घेऊन वावरले! १९८३ सालची गोष्ट!
कवितेमुळे बाहेरचं जग दिसलं, बॉयकट, बांगड्या न घालणं याला मान्यता मिळाली….म्हणजे कुणी नावं तरी ठेवली नाहीत! कवितेच्या कार्यक्रमांना जाणं हे माझ्यासाठी दिव्यच होतं, विरोध पत्करून बाहेर पडले!
येरवड्याच्या शाळेत नोकरी साठी अर्ज करा,नंतर सुट्टीत बी.एड.करा असे एका सुहृदाने सुचवलं! पण जिद्द, महत्वाकांक्षी काहीच नव्हतं,
पुढे स्वतःचा दिवाळी अंक सुरु केला तिथेही चिकाटी कमी पडली, पुढे एका मोठ्या अंकाच्या संपादकाने स्वतः फोन करून संपादकीय विभागात आमंत्रित केलं, दोन महिने बिनपगारी काम केले, पैसे त्यांनी दिले नाहीत मी मागितले नाहीत, हा अव्यवहारीपणा!
पण त्याची खंत वाटली नाही, तो एक चांगला अनुभव होता, बस रिक्षाचे पैसे अक्कल खाती जमा!
अविचाराचे अनेक प्रसंग घडले, पण मी हे स्वतःच मान्य करते मी आळशी आणि बिनमहत्वाकांक्षी बाई आहे त्या मुळे *जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया*
स्वतः कष्ट करून अर्थार्जन करायला हवे होते असे वाटते कधी तरी, पण फार खंतही वाटत नाही! कारण तसं सुखवस्तू आयुष्यच वाट्याला आलं कुठलं ही चॅलेंज नसलेलं!
माझ्या इतर जावांपेक्षा माझं आयुष्य वेगळं आहे, फक्त घरात रमले असते तर आयुष्य वेगळं झालं असतं, मी शिस्तबद्ध, गृहकृत्यदक्ष, संसारी अजिबात नाही, पण गृहिणीपद ब-यापैकी सांभाळले, रांधा वाढा उष्टी काढा इती कर्तव्य अजूनही चालूच आहेत!
माझी एक कविता आहे,
मी नाही कुणाची
यशोमय गाथा,
मी एक मनस्वी,
मुक्त छंदातली कविता !
© प्रभा सोनवणे, पुणे