सुश्री ज्योति हसबनीस

शिस्तीची चौकट

(प्रस्तुत है  सुश्री ज्योति  हसबनीस जी  का आलेख  शिस्तीची चौकट)

अतिशय निष्ठेने एखाद्या व्रतस्थासारखं आपला दिनक्रम पाळणाऱ्या व्यक्तिंविषयी मला नेहमीच आदर आणि कुतूहल वाटत आलंय. आदर त्यांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीबद्दल आणि कुतूहल नेमकी कुठल्या मातीची ही मंडळी बनलीत त्याबद्दल !

उजाडल्यापासून  तर मावळेपर्यंत एका ठराविक पद्धतीनेच दिवसाची वाटचाल करणं यांना पसंत असतं. त्या आखीव रेखीवपणात एकही रेष जागची हललेली यांना चालत नाही. नियमितपणे अनियमितपणा करण्यावर यांचा काडीमात्र विश्वास तर नसतोच पण अनियमितपणा ह्या शब्दाला त्यांच्या शब्दकोषात स्थानच नसते ! पेपर वाचायचा झाला तरी ठराविक वेळेतच ठराविक बातम्यांना प्राधान्य देतच त्याला गुंडाळणार, मग कितीही वाचनीय संपादकीय असू दे, की मजेदार लेख असू दे ! घड्याळाच्या काट्यांची पोझिशन हवी ती आली की पेपरची गुंडाळी भिरकावलीच ! फिरायला निघाले तरी,डोळ्यांवर झापडं बसवल्यासारखी अगदी नाकासमोर चालणार, पक्ष्यांची मंजुळ साद ऐकून कान टवकारणार नाहीत, की आवाजाच्या रोखाने वेध घेणार नाहीत. चालीमध्ये ठराविक गती राखत, अध्ये मध्ये न रेंगाळता, झपझप योजलेला पल्ला पार करत व्यवस्थित घर गाठणार !दिवसभराचं व्यस्तपण घरी आल्यावर तरी शांत करतं का ..? छे: एक नजर मोबाईलवर अर्ध ऑफिस समर्थपणे पेलण्यात गुंगलेली तर एक नजर घड्याळाच्या काट्यांच्या गरगरण्यात गुंतलेली !आली रे आली हवी तशी पोझिशन काट्यांची की  अन्न हे पूर्णब्रह्म मानून तेही एका रिच्यूअल सारखं आटोपून दिवसाची अखेर TV समोर रंजक करायला हे मोकळे ! हातात रिमोट जरी असला तरी त्यावर ठराविकच चॅनेल्स चे नंबर असावेत की काय याची दाट शंका यावी इतकी आलटून  पालटून इन मिन तीन जरी नाही तरी पाच ते सहा चॅनेल्स बघणार ज्यात कधीही चटकदार सीरियल्स नसणार, मूव्हीज नसणार ..! हो , जगभरातल्या घडामोडींची मात्र रेलचेल असणार !

झोप यांच्या डोळ्यावर कधीच नसते ती तर घड्याळाच्या काट्यांवर असते …? त्यांची ह्यांना जमेल तशी हातमिळवणी झाली की निद्रा त्यांच्यावर प्रसन्न झालीच म्हणून समजा ! एका शिस्तबद्ध कार्यक्रमाची सांगता यशस्वीपणे झाल्याच्या खुषीत ही मंडळी लयबद्ध घोरू देखील लागतात !

कित्येकदा ह्या शिस्तबद्ध चौकटीचे कोन आजूबाजूच्यांना खुपतात, त्रासदायक ठरतात, पण ह्या शिस्तबद्ध चौकटीतलं जग अत्यंत सुरक्षित असतं, अनियमितपणाला घातल्या जाणाऱ्या नियमित वेसणामुळे एक अंगभूत अशी संरक्षक कवच कुंडलं ह्याला प्राप्त झालेली असतात,  ही शिस्तशीर चौकटच त्या जगाची शान असते !

© ज्योति हसबनीस

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Leena Kulkarni

Fantastic! Well said.