कविराज विजय यशवंत सातपुते

☆डॉ बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्यातील नाते☆

(प्रस्तुत है  कविराज विजय यशवंत सातपुते जी  द्वारा  राष्ट्र निर्माता डॉ बाबासाहेब आंबेडकर  जी के १२८ वीं जंयती पर “काव्य विचार मंच  द्वारा राज्यस्तरीय लेख प्रतियोगिता हेतु रचित शोधपूर्ण लेख  जिसमें  डॉ  आंबेडकर जी  एवं रमाई जी के सम्बन्धों का उल्लेख मिलता है।)  )

उजेडाच्या झाडाखाली, रमा मातेची  पाखर.

शब्दा शब्दांतून झरे, तिच्या स्नेहाचा पाझर.. . !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर  एक  उजेडाच झाड. रमाबा ई आंबेडकर या नावाची पखरण वैवाहिक जीवनात होताच हे  उजेडाच झाड आपल्या कार्य कर्तृत्वाचा परीघ वाढवीत गेलं. रमा वलंगकर हे रमाबाईचे माहेरचे नाव. भायखळ्याच्या भाजी मार्केट मध्ये इ. स. 1906 मध्ये रमाबाई आणि भीमराव आंबेडकर विवाह बद्ध झाले. चौदाव्या वर्षी बाबासाहेबांचे दोनाचे चार हात झाले.  अवघ्या नऊ वर्षाची रमाई बाबासाहेबांची सहचारिणी झाली  आणि त्यांचे वैवाहिक जीवन सुरू झाले.

गतीमान  आयुष्याची, नितीमान वाटचाल

भवसागरी झेलली,  सुख दुःखे दरसाल. . .!

      अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला. माहेरची परीस्थिती जेमतेम होती.  कुठलाही डामडौल नाही दिखावा नाही.  अत्यंत साधेपणाने हा विवाह संपन्न झाला  आणि रमाबाईच आयुष्य गतीमान झालं. दाभोळच्या बंदरात वडील मासेमारी करायचे.  तीन बहिणी  आणि लहान भाऊ  असा परिवार  असताना  घरच्या जबाबदाऱ्या लहानग्या रमा ला स्वीकाराव्या लागल्या.  फुलत्या वयात आई, वडिलांच्या निधनाचे दुःख पचवून या  उजेडाच्या झाडाखाली विसावली.

वैवाहिक जीवन सुरू झाले पण  कष्टमय जीवन पाठराखण करीत होते.  सासू,  सासरे यांचे  अल्पशा आजाराने निधन झाले त्यावेळी रमाई ने बाबासाहेबांना वयाने लहान असूनही खूप मोठा  आधार दिला.  मायेचं छत हरवलेली रमा प्रतिकूल परिस्थितीचा प्रत्येक वार पावसाची सर झेलावी इतक्या सहजतेने झेलत होती.

जेव्हा रमा वयात आली तेव्हापासून हे मृत्यू सत्र ती अनुभवीत होती. ‘पोटच्या मुलाचे निधन’ हा ही धक्का रमाबाई ने कणखर पणे पचवला.

मरण म्हणजे काय कळत नव्हते त्या अजाण वयात रमाईच्या आई वडिलांचा मृत्यू झाला. इ.स. १९१३ साली बाबासाहेबांचे वडील रामजी सुभेदार यांचे निधन झाले. इ.स. १९१४ ते १९१७ साली बाबासाहेब अमेरिकेला असताना मुलगा रमेशचा याचे अकाली निधन झाले. १९१७  सालच्या  ऑगस्ट मध्येच बाबासाहेबांची सावत्र आई  जिजाबाई यांचे निधन झाले. याच दरम्यान  मुलगी इंदू, रमाईचा दिर,   आनंदराव व आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा यांचे निधन झाले . हे मृत्यू सत्र एकोणीशे सव्हीस पर्यंत चालूच राहिले  इ.स. १९२१  मुलगा बाळ गंगाधर, व इ.स. १९२६ मध्ये राजरत्‍नचा मृत्यू अविस्मरणीय दुःख या काळात पचवावे लागले.  भीमराव  आणि रमाई दोघांनी परस्परांना धीर देत,स्वतःला सावरत या परिस्थितीतून मार्ग काढला.  रडत बसण्यापेक्षा पडेल ते काम करून संसार सावरण्याची रमाई ची जिद्द महत्वाची ठरली.

संसारात प्रतिकूल परिस्थिती पाठ सोडत नव्हती. प्रसंगी शेणी,गोव-या थापून त्या बाजारात विकून संसार सावरला. भल्या पहाटे उठून रस्त्यावर पडलेले शेण  उचलून  आणायचे काम सोपे नव्हते पण मोठ्या जिद्दीने रमाई कष्ट करीत राहिले. तिने केलेले हे कष्ट भीमस्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक वेळी उपयोगी पडले.

इ.स. १९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले होते, त्यावेळी  अतिशय बिकट परिस्थिती आलेली. कुटुंबाची  खूपच वाताहत होत होती.  दुष्काळाच्या आगीत सारे कुटुंब  होरपळत होते भीमरावांच्या समकालीन निष्ठावान  कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पहावले नाहीत. त्यांनी काही आर्थिक मदत रमाई ला देऊ केली.  . तिने त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते पैसे स्विकारले नाहीत. स्वाभिमानी  डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची ती स्वाभिमानी पत्‍नी जिद्दीने दुःखांशी अडचणींशी गरिबीशी झगडत होती. मृत्युसत्र दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई भीमराव आंबेडकर.

अनेक नातलगांचे मृत्यू पहाताना रमाई खचत गेली. पण हार न मानता भीमस्वप्न पूर्ण करण्यासाठी  आणि  बाबा साहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून  काही दुःखे  स्वतः पचवीत गेली.त्यांना तातडीने  कळविले नाही. परदेशा गेलेल्या  बाबासाहेबांना  रमाईने  कधी आपल्या दु:खाची झळ पोहचू दिली नाही. ज्ञानसाधना करताना  कुठलाही  अडथळा नको म्हणून काही परिवाराचे हालअपेष्टा, संसार खस्ता रमाई ने स्वतः सहन केल्या.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  शिक्षणासाठी परदेशी  असताना . रमाई एकट्याने संसाराचा डोलारा सांभाळत होती.. घर चालवण्यासाठी तिने शेणी, गोवर्‍या विकल्या .. सरपणासाठी वणवण फिरत,  पोयबावाडीतून दादर माहीम पर्यंत ती जायची. त्या वेळी  बॅरिस्टराची पत्‍नी शेण वेचते या बातमीने बाबासाहेबांना कमी पणा येईल . म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री ८.०० नंतर, रमाई वरळीला जाऊन गोवर्‍या थापायची काम करायची.   मुलांसाठी उपास तापास करत रमाई भीमरावाच्या भीमस्वप्नांना आकार देत गेली.

अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून तावून सुलाखून  निघालेले बाबासाहेब जेव्हा  समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी व त्यासाठी निष्णात डॉक्टर होण्यासाठी अपार कष्ट घेऊ लागले,तेव्हा ही रमाई अर्धपोटी उपाशी राहून बाबासाहेबांना भक्कम साथ देत गेली. तिच्या सहयोगाने बाबासाहेब  अठरा  अठरा  तास अभ्‍यास करु लागले, पण रमाई ने त्या ज्ञानसाधनेत कधी व्यत्यय येऊ दिला नाही.  रमाईने आपल्‍या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने ,स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत तर केलीच पण पत्नीची सारी कर्तव्ये चोख पार पाडली.

संकटांचा  केला नाश, ध्येय पूर्तीचाच ध्यास

कधी ऋतू विरहाचा, कधी सौभाग्याचा श्वास. . !

नाही धडूत नेसाया,तरी हार ना मानली.

भरजरी फेट्यातून, परिस्थिती हाताळली. . !

      डॉ. बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन मायदेशी मुंबईत परतले तेव्हा  त्यांच्या स्वागताला सर्व  समाज बांधव मोठ्या प्रमाणावर  मुंबई बंदरात आले होते.  रमाईला नेसण्यासाठी चांगली साडी देखील  नव्हती.  अशावेळेस बोभाटा न करता रमाई ने मोठ्या शिताफिने हा प्रश्न सोडवला. छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या सत्कारप्रसंगी दिलेला भरजरी फेटा त्याची साडी  नेसून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी रमाई सामोरी गेली.

डॉक्टर बाबासाहेब रमाई ला रामू म्हणून हाक मारायचे. ते बोटीतून उतरताच त्यांच्या जयजयकाराने संपूर्ण  बंदर दुमदुमून गेले. अनेकजण त्‍यांना शुभेच्छा देत  होते, हस्तांदोलन करीत होते. पण रमाई मात्र  या सा-यातून लांब कोपऱ्यात उभी होती. डॉ. बाबासाहेबांची नजर त्यांच्या रामूवर गेली. ते  त्या गर्गेदीतून वाट काढीत  रमाई जवळ गेलेत्यांनी विचारले,” रामू तू लांब का उभी राहीलीस? ” तेव्हा रमाई म्‍हणाली,” तुम्हाला भेटण्यासाठी  समाज बांधव आतूर झालेले  असताना मी तुमचा इथे वेळ घेणे योग्य नाही. मी तर तुमची पत्नीच आहे. आपण  एकमेकांना  कधीही भेटू शकते” हे पारिवारीक नात रमाई ने जीवापाड जपले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून रमाई  प्रवेशद्वारावर तासनतास बसून राहायची. बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यावर , प्रत्येकाशी तितक्याच अदबीने वागत, “साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात,  वाचनात , महत्वाच्या कामात आहेत, नंतर सवडीने  भेटा.” असे सांगे. अशी पाठवण करताना रमाई प्रत्येकाचे त् नाव, गाव, कामाचे स्वरूप, पुन्हा कधी येणार आहात, हे सारे एका नोंदवहीत त्या व्यक्तीला नोंद करून ठेवण्यास  सांगत.

मानव्याची उषःप्रभा, असणारी, तमाम भीमलेकरांची  संजीवनी रमाई संस्काराचे ज्ञानपीठ, मनोमनी रूजवीत गेली.  संसार करताना आलेले अडीनडीचे दिवस,  शिताफीने दूर केले. अनेक छोट्या मोठ्या गृहोपयोगी वस्तूची सचोटीने विक्री करून पै पे जोडत परीस्थिती सावरणारी रमाई बाबासाहेवांच्या जोडीने समाज कार्यात सहभागी झाली.दागदागिन्यांचा सोस नसलेली रमाई दुसर्‍याला  आनंद देण्यासाठी जगली.

रमाईंनी अठ्ठावीस वर्षे बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली रमाईचे शरिर अतोनात केलेल्या कष्टाने पोखरुन गेल होते.दरम्यान रमाईचा आजार बळावला होता. इ.स. १९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच गेला. मे १९३५ला तर आजार खूपच विकोपाला गेला त्यावेळी  बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. पण कुठल्याच औषधोपचारारला रमाईचे शरीर साथ देईना. या काळात  बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत. बोलण्याचा प्रयत्‍न करीत असत; पण अंगात त्राण नसल्यामुळे ती बोलू शकत नव्हत्या. आपल्या रामूला  बाबासाहेब स्वतः  औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वत:च्या हाताने पाजण्याचा प्रयत्‍न करीत असत. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असे. पण काही केल्या रमाईचा  आजार  बरा झाला नाही. आणि बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला . २७ मे १९३५ रोजी सकाळी ९ वाजता रमाईची प्राण ज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यवधी रंजल्या गांजल्याची रमाई माता त्यांची रामू बाबासाहेबांना सोडून गेली.

बाबासाहेब आंबेडकरांचे रमाबाईंवर निस्सीम प्रेम होते. तिचे कष्ट पाहून त्यांचे मन तुटायचे. त्यांनी आपल्या रामूला पाठवलेल्या पत्रात बाबासाहेबांनी या भावना शब्दांकित केल्या आहेत. . ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या ‘प्रिय रामू’ला अर्पण केला तेव्हा अर्पणपत्रिकेत बाबासाहेबांनी लिहिले  की, ‘‘तिच्या हृदयाचा चांगूलपणा, मनाची कुलीनता आणि शीलाच्या पावित्र्यासह तिचे शालीन मनोधैर्य नि माझ्याबरोबर दु:ख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसांत तिने मला दाखविली- जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रविरहित काळ चिंतेसह कंठीत होतो. या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूच्या आठवणींत कोरलेले हे प्रतीक…’’ आपल्या पत्नीबद्दलच्या,रमाई बद्दलच्या या  भावना बाबासाहेबांच्या या अर्पणपत्रिकेतून व्यक्त झाल्या. आणि रमाई भीमराव यांच नात समाज बांधवांच्या काळजात घर करून राहिल.

मान द्यावा,  मान घ्यावा, ही रमाईची शिकवण आजही भीम लेकरांच्या मनी, एक एक साठवण.. म्हणून शिलकीत आहे  पोलादी पुरूष झालेली रमाई जीवनाच्या वादळात  कधी डगमगली नाही. भीमरावाच्या कार्याला, तीन दशकांची साथ देणारी  रमाई, अनाथांची  नाथ…  झाली. अशी, माता, पत्नी, गुणी कन्या जगती आदर्श ठरली.  ‘रमा ची रमाई झाली’ तिला समाजाने, मान दिला.  तिचे स्वागत सहर्ष… सर्व ठिकाणी केले गेले. तिच्या कर्तृत्वात,  संस्काराची मोतीमाळ हीती. तिच्या कार्याची  प्रेरणा,  सदा सर्वकाळ… मना मनात तेवत राहिल.

घटनेचे शिल्पकार डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव जेव्हा जेव्हा घेतल जाईल तेव्हा तेव्हा ही माता रमाई आसवांची शाई बनून जगताला सांगत राहिल.

“असे होते भीमराव,  आणि  अशी होते मी”

 

© विजय यशवंत सातपुते

100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर 2, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.

मोबाईल  9371319798.

 

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments