मराठी साहित्य – मराठी आलेख – ☆ देवा होऊ कशी उतराई ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का e-abhivyakti में हार्दिक स्वागत है। धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झालक  देखने को मिलती है। हम भविष्य में आपके उत्कृष्ट साहित्य की अपेक्षा रखते हैं। आज प्रस्तुत है उनका आत्मकथ्य “देवा होऊ कशी उतराई”।) 

 

देवा होऊ कशी उतराई

 

आज वळून मागे पहाताना मला दिसतंय की, भगवंताने मला जन्मल्यापासूनच किती भरभरुन दिलंय.

जन्म पिता रामचंद्र माता सरस्वती यांच्या पोटी. आजी राधा माझी प्रियतमा.काका काकू ज्यांनी जन्म दिला नसला तरी मातपित्यापेक्षाही उच्च प्रेम व संस्कारांनी वाढवलं. शिकवलं अतिशय मायेनं पालनपोषण करुन लग्न करुन देऊन पुढे माझं बाळंतपण, माझ्या मुलांनाही तितक्याच मायेनं किंबहुना त्यापेक्षा जास्त. वाढवलं संस्कारित केलं.

माझ्या लहानपणी मी काका काकूंकडे म्हणजे आम्ही सर्वच भावंडं वयाच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून काकू म्हणजे माईकडेच वाढलो. काका म्हणजे आण्णा तालुक्याच्या गावी तालुकामास्तर म्हणून सेवेत होते. त्यामुळे आमचं शिक्षण त्यांचेकडेच झालं. किंबहुना त्या‌दोघांमुळेच झालं.

खेड्यात राहूनही आमच्याकडून बोलताना लिहिताना उच्चार चुकले तर ओठावर फट्कन् आण्णांची दोन बोट उमटायची. त्यामुळे बाळपणापासूच वाणी शुद्ध झाली.

पहाटे चार वाजता आम्हा भावंडांना  उठवून काही व्यायाम व अभ्यास याची सवय बाळपणापासूनच लागली. आजही वयाच्या पंच्याहत्तरीत मी पहाटे उठून नियमित व्यायाम प्राणायाम,आता अध्यात्मिक अभ्यास,लिखाण व कविता करते.

भाषा समृद्ध होण्याचे आणखी महत्त्वाचे कारण म्हणजे मला सुदैवाने शालामाऊलीही अत्यंत चांगली लाभली. न्यू इं.स्कूल सातारा. या माझ्या शाळेत मला सर्वच विषयाचे शिक्षक अतिशय भले भेटले. संस्कृत या माझ्या अत्यंत आवडत्या विषयाला पू. गुरुवर्य आपटीकर लाभले. संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक होतेच परंतु बऱ्याच पौराणिक ग्रंथांचा त्यांनी सखोल अभ्यास केलेला होता. त्यांच्यामुळे माझं संस्कृत विषयाचं ज्ञान उत्तम झालं. आयुष्यात मला त्यांचा खूप मोलाचा उपयोग झाला. आजही मी माझ्या नातवंडांनाच नाही तर शेजारच्या मुलांनाही संस्कृत शिकवते, मार्गदर्शन करते.कारण ती देवभाषा आहे सर्वांना ती माहिती असणे आवश्यक आहे. असा माझा दृढ विश्वास आहे.

©®उर्मिला इंगळे, सातारा