मराठी साहित्य – मराठी कथा – ☆ समतोल ☆ – श्री कपिल साहेबराव इंदवे

श्री कपिल साहेबराव इंदवे 

 

(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है। आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है। एक युवा लेखक  के रुप  में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते।  हम भविष्य में श्री कपिल जी की और उत्कृष्ट रचनाओं को आप तक पहुंचाने का प्रयास करेंगे। आज प्रस्तुत है  उनकी एक कहानी समतोल ।)

 

☆ समतोल ☆

 

” काय होईल पुढच्या आयुष्यात काही कळत नाहीये यार. कुठली म्हणजे कुठलंही गणित जुळून येत नाहीये.” आदिती राघवला बोलत होती. बाजुला बसलेली रागीणीही गंभीर होऊन एकत होती.

रागीणी आणि राघव तिचे काॅलेजचे मित्र. पण त्यांच्यात एक जिवाभावाचं नातं बनलं होतं. माणसं जोडण्याची  किंवा जोडून ठेवण्यासाठी रक्ताच्या नात्यांची गरज नसते. हे त्यांच नातं गवाही देत होतं. त्यांचा गृपच एकंदर मस्तीखोर आणि अभ्यासूही तेवढाच होता.

काॅलेज सोडून पाच वर्षापेक्षा अधिक काळ होऊनही त्यांची मैत्री घट्ट होती. कोणीही कोणालाही विसरलं नव्हतं. सुरूवातीला एकमेकांच्या घरी येणं जाणं असायचं पण वेळ सरकत गेली तशी काहींची लग्न झाली. तर काहीनी जाॅब मुळे भेटणं बंद केलं. पण फेसबुक, व्हाटसअॅप मुळे सगळे एकमेकांबददल अपडेट होते. काही खास मोक्याच्या वेळी येणं जाणं असायचंच. पण आज तिच्या वाढदिवसाला जास्त मित्र आले नव्हते. आदितीचाही वाढदिवस साजरा करण्याचा काही प्लॅन नव्हता. तिच्या मनात मागच्या काही दिवसापासुन कोणत्यातरी एका कारणावरून घालमेल सुरु होती. खुप विचार करूनही ती कुठल्या एका निर्णयावर पोहोचत नव्हती. नितीनने जेव्हा तिला बर्थडे पार्टीसाठी फोर्स केला तेव्हा ती आधी तयार नव्हती. पण मित्रांना भेटून काहीतरी मार्ग काढावा म्हणुन ती ही तयार झाली. निवांत बोलू म्हणुन तीने शहराबाहेर एक ढाबावर त्यांना नेले. राघवचे मामा तिथेच मॅनेजर होते. मामांनी त्यांना एक टेबल खाली करून दिला. केक कापला गेला. नेहमीच हसत राहणारी आदिती आज नेहमीप्रमाणे हसत नव्हती. चेह-यावर जरी हसू असले तरी डोळ्यांत ते स्मित दिसत नव्हते. हे राघवने कधीच हेरले होते.

केक कापून  झाल्यावर जेवण  मागवून त्यांनी जेवायला सुरुवात केली. आदितीने आपल्या हातातल्या चमचने पहिला घास उचलला. आणि तोंडात टाकायला घेतला. तेवढयात राघव तिला म्हटला. “आदिती, तु काहीतरी डिस्कस करणार होती ना आमच्याशी ?” त्याच्या प्रश्नाने आदिती दचकली. तिचा चमच ओठांजवळच थांबला. तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. त्याने एक घास घेतला आणि म्हटला. ” अगं बघतेयस काय? बोल ना काय म्हणणार होतीस ते”  ती अजुनही गोधळलेली होती. ” पण तुला कसं कळलं” तीने गोंधळून विचारले. राघव- ” बाळं, तु अजुन लहान बाळ आहेस. डोळ्यातले भाव लपवता येत नाही तुला अजुन. नुसतं चेह-यावर हास्य ठेऊन चालतं नाही. ते डोळ्यांतही असु द्यावं लागतं. बोल काय म्हणतेयस” ती आता पुर्णपणे कंफर्ट झाली होती. त्याचं तिला भारी कौतुक वाटलं. ती बोलू लागली ” काय होईल पुढच्या आयुष्यात काही कळत नाहीये यार. कुठली म्हणजे कुठलीही गणित जुळून येत नाहीयेत” ती क्षणभर थांबली. आणि बोलू लागली ” आज वयाची सव्वीस वर्षे पूर्ण झाली. सत्ताविस सुरूही झालं. आई म्हणतेय लग्न करून घे. काही कळत नाहीये. पुरता गोंधळ झालाय माझा.” त्याला तिच्या बोलण्यात गांभीर्य जाणवले. तो म्हटला  “अगं करायचं ना मग लग्न. त्यात काय एवढं विचार करण्यासारखं.”

आदिती मात्र गंभीर होती. ” इतकं सोपं नाहीये माझ्यासाठी ते. तुला माझी परिस्थिती माहीती आहे. बाबा चोवीस तास नशेत असतात. मोठया बहीणीचं लग्न झालंय. श्रध्दा आणि संध्या लहान आहेत अजुन. ते आईला नाही सांभाळू शकणार. भाऊ असता तर त्याच्या भरवशावर एकवेळ सोडलंही असतं. पण देवाने तिच्या नशिबी हे भोग दिलेत. आणि आता मी लग्न करून गेले तर किती मर-मर होईल तीची” बोलता-बोलता तिच्या डोळ्यांत पाणी आलं. रागीणीने तिच्या खादावर सहानुभूतीचा हात ठेवला. राघव ” आदिती बरोबर आहे तुझं म्हणणं. पण काही विशिष्ट गोष्टी विशिष्ट वेळेवर झाल्या कि आयुष्याची घडी व्यवस्थित बसते. लग्नही त्यातलंच एक. ते ही वेळेवर नाही झालं कि खुप सारे अर्थ उलगडत नाहीत. आज ठिक आहे तु यंग आहेस. तर सगळं काही करू शकतेस.  त्यांनाही आणि स्वतःलाही सांभाळू शकतेस. पण आजपासुन यु जर काही वर्षे पुढे गेली ना तेव्हा तुला दिसेल कि तु घेतलेला निर्णय चुक होता कि बरोबर.

मी हे म्हणत नाही कि तु लग्न कर. पण स्वत:ला थोडं पुढे नेवून चल. साधारणतः पंचेचाळीस-शेहेचाळीस वयामध्ये. आई बाबा हयात राहीले तर त्यांच म्हातारपण तुलाच सांभाळायचं आहे. आणि जर समजा नसले तर काय? तु स्वतच्या सामर्थ्यावर जे साम्राज्य उभं केलयस त्याचं काय? सोड साम्राज्याचं. पण हा जो तुझ्या आयुष्याचा वड आहे. त्या वडाला जर पारंबीचं नसेल तर त्याला काही शोभा राहणार का? कोणत्या आधाराने जगशील पुढचं आयुष्य? तुझ्या म्हातारपणाची काठी सांभाळायला तुला हात नकोत? बघ आदिती, माणसाला प्रत्येक परिस्थितीत जगावं लागतं. पण त्या जगण्यालाही काहीतरी कारण लागतं. आणि ते कारण तुला लग्न करूनच भेटतील”

आदिती त्याचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकत होती. तिला मन मोकळं झाल्यासारखं वाटत होतं. तिने डोळे पुसले. आणि म्हटली ” मग मी काय करायला हवं ?” तिने  त्याला प्रश्न केला. त्याला कदाचित हा प्रश्न अपेक्षितच होता. आणि त्याच्याकडे उत्तर तयारच होते. असे भाव त्याच्या चेह-यावर दिसत होते. ” अगं सोप्प आहे. जो कोणी मुलगा असेल ना त्याला सांग कि तुझी अडचण काय आहे.  तो समजुन घेईल तुला. मग तु तुझ्या आईची काळजीही घेऊ शकतेस. आणि तीला गरज पडली तर तुझा पगारही देऊ शकशील.” आदिती ” कोण भेटेल असा समजुन घेणारा ? तु करशील माझ्याशी लग्न? ” ती सरळ बोलुन गेली. त्यावर रागीणी पुरती दचकली. तिच्या हातातलं चमच खाली पडलं. ती वाट पाहु लागली कि राघवचे उत्तर काय असेल. तो मात्र शांत होता. स्मित हसुन तो बोलला. ” केले असते तुझ्याशी लग्न. तुझ्या सारखी मुलगी भेटायला भाग्य घेऊन जन्मावं लागेल. पण तु मला मित्र कमी आणि भाऊ जास्त मानले आहेस. आणि मी ही बहीणीपेक्षा कमी दर्जा नाही दिला तुला. म्हणुन एका भावाची जबाबदारी म्हणुन तुला हसत ठेवणं माझं कर्तव्य आहे.”

आदिती मात्र स्मित हसली. रागीणीलाही तिचं उत्तर मिळालं होतं. जेवण संपल्यावर त्यानी रागीणीला तिच्या घरी सोडले. आणि आदितीलाही पोहोचवण्यासाठी तिच्या घरापर्यंत गेला. आदिती गाडीतून उतरली. आणि जाऊ लागली. राघवने तिला आवाज दिला ” आदिती ” ती मागे फिरली. ” काळजी करू नकोस. कोणी नाही तर मी आहे सक्षम आईसाठी ” आणि तो निघून गेला. आदिती त्याला स्वाभिमानी नजरेने पाहत राहीली.