सौ कुंदा कुलकर्णी
वेद व पुराण काळातील महत्वपूर्ण स्त्रिया
☆ गार्गी वाचकन्वी ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆
गार्गी वैदिक काळातील अत्यंत विद्वान स्त्री होती. गर्ग गोत्रात जन्म झाला, म्हणून तिचे नाव गार्गी. वाचकनू ऋषींची कन्या म्हणून तिला गार्गी वाचकन्वी म्हणतात. ती प्राचीन भारतीय तत्वज्ञ होती. वैदिक साहित्यात तिला एक महान नैसर्गिक तत्वज्ञानी, वेदांची अभ्यासक आणि ब्रह्म विद्येचे ज्ञान असलेली व्यक्ती ब्रह्मवादिनी म्हणून देखील ओळखले जाते. तिने ऋग्वेदात अनेक स्तोत्रे लिहिली. तिने आजीवन ब्रह्मचर्य पाळले . तिची कुंडलिनी शक्ती जागृत होती. गार्गी ही वैदिक युगातील पहिली स्त्री तत्वज्ञ होती. ती मिथिला शहरात राहात असे.
एकदा राजा जनकाने ब्रम्हसभेचे आयोजन केले. सर्व नामवंत विद्वानांना आमंत्रण दिले. या सर्वात श्रेष्ठ विद्वान कोण हे शोधण्यासाठी त्याने एक युक्ती केली. 1000 गाईंच्या शिंगांना दहा तोळे सोने बांधले आणि आणि सांगितले तुमच्या सगळ्यात उत्तम विद्वान असेल त्यांनी या गायी न्याव्या. कुणाची हिम्मत होईना. याज्ञवल्क्य ऋषि आत्मविश्वासाने उठले आणि त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितले या सर्व गाई घेऊन जा. सर्व विद्वानांनी अडवले व तुमचे श्रेष्ठत्व सिद्ध करा असे सांगितले. याज्ञवल्क्य म्हणाले मला गायींची गरज आहे. त्या घेत आहे. मी तुमच्याशी वाद-विवाद करू शकतो. सर्व ऋषींच्या प्रश्नांना त्यांनी योग्य उत्तरे दिल्यामुळे सर्वजण गप्प बसले पण जनक राजाच्या परवानगीने गार्गी उभी राहिली तिनेअतिशय काळजीपूर्वक व सखोल अभ्यासावर आधारित असे अनेक प्रश्न विचारले. त्यांची योग्य उत्तरे तिला मिळाली
तिने विचारले पाण्यामध्ये सगळे पदार्थ मिसळतात मग हे पाणी कशामध्ये मिसळते?, ऋषी उत्तरले पाणी शेवटी हवेत शोषले जाते. तिने विचारले, हवेत कुठे मिसळते? ऋषी म्हणाले अवकाशाच्या जगात मिसळते .आता तिने त्यांच्या प्रत्येक उत्तराला प्रश्नात बदलले. आणि विचारले, अशाप्रकारे गंधर्व लोक, आदित्य लोक ,चंद्रलोक, नक्षत्र लोक, देवलोक, इंद्रलोक, प्रजापती लोक, आणि ब्रह्म लोकांपर्यंत पोचते. शेवटी ब्रम्ह लोक कोणामध्ये आहे?
तिचा दुसरा प्रश्न असा होता की आकाशाच्या वर जे काही आहे आणि पृथ्वीच्या खाली जे काही आहे आणि या दोघांच्या मध्ये जे काही आहे या दोघांच्या मध्ये बरंच काही घडतं तर हे दोघे कशात गुंतलेले आहेत? तिचा पहिला प्रश्न स्पेस आणि दुसरा प्रश्न टाईम संबंधी होता. तिने विचारले संपूर्ण विश्व कुणाच्या आधीन आहे? त्याचे उत्तर मिळाले अक्षर तत्त्वाचे. ऋषीनी वर्णमालेबद्दल सविस्तर माहिती दिली. तिचा आणखी एक प्रश्न होता आत्मज्ञानासाठी ब्रह्मचर्य आवश्यक आहे. लग्नाचे बंधन नको. कारण बंधनामुळे इतरांची काळजी घ्यावी लागते. ऋषी उत्तरले लग्न करणे, इतरांची चिंता करणे हे बंधन नाही. संपूर्ण जग निस्वार्थी प्रेमाचा पुरावा आहे. सूर्याची किरणे, उष्णता, आणि प्रकाश पृथ्वीवर पडला तर जीव जन्माला येतो. ही पृथ्वी सूर्याकडे काहीही मागत नाही. तिला फक्त सूर्याच्या प्रेमात कसे फुलायचे एवढेच माहीत असते. सूर्य सुद्धा पृथ्वीवर वर्चस्व गाजवत नाही. प्रकृती आणि पुरुष यांचे कर्मयोग आणि जीवन हे त्यांच्या खऱ्या प्रेमाचे फळ असते. गार्गी चे पूर्ण समाधान झाले. पण पुराणात असा उल्लेख आहे की शेवटी तीच जिंकली. तिला याज्ञवल्क्य यांच्या बुद्धिमत्तेबद्दल आदर होता. तिने त्यांचे श्रेष्ठत्व मान्य केले. व हेच सर्वात श्रेष्ठ विद्वान आहेत असे सांगून गायी नेण्यास सांगितले. या दोघांच्यामध्ये जो संवाद झाला त्याच्यावर योग याज्ञवल्क्य हा योगावरील शास्त्रीय ग्रंथ तिने लिहिला. अशी ही असामान्य विदुषी आणि अतुलनीय प्रतिभावंत गार्गी. तिला कोटी कोटी कोटी प्रणाम.
© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
क्यू 17, मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे
मो. 9527460290
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈