सौ कुंदा कुलकर्णी
वेद व पुराण काळातील महत्वपूर्ण स्त्रिया
☆ उभया भारती ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆
उभया भारती
उभया भारती ही मंडनमिश्र यांची पत्नी होती. मंडन मिश्र हे वेदांती पंडित होते. दोघे पती-पत्नी अति विद्वान असून आदर्श जोडपे होते. ते दोघे मध्य प्रदेशातील बिहार राज्यात माहिष्मती नगरी येथे राहत होते. मंडनमिश्र आदि शंकराचार्यांचे समकालीन असून वेदांती पंडित होते. मंडनमिश्र हे ब्रह्म देवाचा अवतार व उभया भारती सरस्वतीचा अवतार असे मानले जाते.
शंकराचार्य अत्यंत विद्वान होते. त्यांना संन्यास मार्गाचा प्रचार करायचा होता. पण त्यापूर्वी त्यांना मंडनमिश्र यांच्याशी वादविवाद करण्यास सांगितले गेले. म्हणून शंकराचार्य माहिष्मती नगरीत आले. त्यांनी तेथे मंडनमिश्र यांचा पत्ता विचारला असता लोकांनी सांगितले” ज्यांच्या घराच्या दरवाजावर एका पिंजऱ्यात बंदिस्त असलेले , पोपट संस्कृत मधून अमूर्त विषयांवर चर्चा करत असतील ते त्यांचे घर होय.” त्याप्रमाणे शंकराचार्य तिथे आले. एका पिंजऱ्यात मैना आणि पोपट बंदिस्त असून त्यांच्यात चर्चा रंगली होती विषय खालील प्रमाणे होते.
1) वेद स्वप्रमाणित आहेत की नाहीत?
2) कर्माचे फळ कर्म सिद्धांत देतो की ईश्वर
3) जग नित्य आहे की अनित्य आहे?
हे संभाषण ऐकून शंकराचार्य आश्चर्यचकित झाले व त्यांनी मंडनमिश्र यांना वाद-विवाद सभा घेण्यास सांगितले. त्यासाठी योग्य व्यक्ती म्हणून उभया भारतीने न्यायाधीश बनावे असे ठरले. या वादामध्ये जो पराभूत होईल त्याने विजेत्या चा आश्रम स्वीकारावा असे ठरले. मंडन मिश्र हरले तर त्यांनी संन्यास धर्म स्वीकारावा व शंकराचार्य हरले तर त्यांनी विवाह करून गृहस्थाश्रम स्वीकारावा असे ठरले.
दोघे अतिशय विद्वान असल्यामुळे वाद-विवाद अतिशय गतिशील आणि मनोरंजक होता. दोघेही ज्ञानाचे दिग्गज होते. भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास दोघांचा उत्तम होता.
उभया भारती गृहिणी होती. तिला खूप दैनंदिन कामे होती. तिने एक युक्ती काढली. दोघांच्या गळ्यात एक सारखे फुलांचे हार घातले. ज्याच्या गळ्यातील हारातील फुले सुकतील तो पराभूत व ज्याच्या गळ्यातील हारातील फुले टवटवीत असतील तो विजयी असे तिने सांगितले. हरलेल्या माणसाला खूप राग येतो. त्याच्या शरीरात उष्णता वाढते व त्यामुळे फुले सुकतात. तिच्या विद्वत्तेवर,नि:पक्षपातीपणावर , शहाणपणा वर दोघांचा विश्वास होता.
अठरा दिवसानंतर तिने पाहिले की मंडनमिश्र यांच्या गळ्यातील हार सुकलेला आहे. तिने शंकराचार्यांना सांगितले, तुम्ही पूर्ण विजेता ठरू शकत नाही. मी मंडनमिश्र ची अर्धांगी आहे. तुम्ही त्यांना जिंकून अर्धे अंग जिंकले. आता माझ्याशी वाद-विवाद करून मला जिंकला तरच तुम्ही विजेता ठराल. शंकराचार्यांनी मान्य केले.
तिने त्यांना कामुक कला आणि विज्ञान यांच्या विषयी प्रश्न विचारले. शंकराचार्यांनी कबूल केले मला यातील ज्ञान नाही. मी बाल ब्रह्मचारी आहे. उभया भारतीने युक्तिवाद केला” तुम्ही सर्वज्ञ आहात ना? मग काम शास्त्राचे ज्ञान तुम्हाला का नाही? भारतीय संस्कृतीने “काम” पुरुषार्थात समाविष्ट केलेला आहे. मग तो त्याज्य आहे का? जर मानवी जीवन निर्मितीचा तो आधार आहे तर तुम्ही त्याच्याकडे तुच्छतेने का पाहता?कामशास्त्राचा अभ्यास केला तर संन्यासधर्माला धक्का बसतो का? तुम्ही स्वतःला सर्वद्न्य समजता पण तुम्ही लग्न केले नाही .कामशास्त्राचे अजिबात ज्ञान नाही. माझ्या प्रश्नांची उत्तरे दिलीत तरच तुम्ही विजेता बनाल.”
शंकराचार्य हार मानायला तयार नव्हते त्यांनी तिच्याकडून मुदत मागून घेतली. परकाया प्रवेश करून एका राजाच्या अंतःपुरात राजाचे रूप घेऊन ते काही महिने राहिले. लैंगिकतेचे पूर्ण ज्ञान मिळवले.व पुन्हा मूळ रूपात
येऊन उभया भारतीच्या या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. तिचे समाधान झाले. तिने शंकराचार्यांना ” सर्वात मोठा वैदिक विद्वान ” घोषित केले. मंडनमिश्र यांनी ठरल्याप्रमाणे संन्यास धर्माचा स्वीकार केला. उभया भारती शापमुक्त झाली व स्वर्गात निघून गेली.
अशा या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्वाच्या उभयाभारतीला प्रणम्य शिरसा वंद्य , वंद्य, वंद्य.
प्रणम्य शिरसा वंद्य , वंद्य, वंद्य.
© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
क्यू 17, मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे
मो. 9527460290
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈