सुश्री ज्योति हसबनीस

प्रेमाला उपमा नाही

(प्रस्तुत है  सुश्री ज्योति  हसबनीस जी  का आलेख प्रेमाला उपमा नाही)

आयुष्याची खुमारी  वाढवणारं प्रेम वयाच्या प्रत्येक टप्प्या टप्प्याला किती वेगळं पण तितकंच मनोरम भासतं ना! सोळाव्या वर्षी नजरेचं  भिरभिरं आपल्या प्रेमाच्या शोधात असल्यासारखं सतत टेहळणीवर असतं. कधीतरी नजरभेट होते, ह्रदयाची धडधड ओळख पटवते, आणि प्रेम गवसल्याचा आभास होतो. हाती गवसलेल्या प्रेमासाठी काय वाट्टेल ते करण्याची तयारी मनाची असते. कधी सफलतेचा आनंद मिळतो तर कधी वैफल्य गाठी येतं. मागचा पुढचा विचार न करता जीव ओवाळून टाकणारं वेडं प्रेम खरंच कित्येकांची आयुष्य उध्वस्त करतं किंवा उजळून टाकतं, पण मला ह्या प्रेमाचं नेहमीच एक विलक्षण आकर्षण वाटत आलंय. जगण्याचा कैफ, जगण्यातली मस्ती, सारं काही आसूसून अनुभवण्याची आणि त्यासाठी उभ्या दुनियेशी लढा देण्याची ह्या ओढाळ आणि झुंजार प्रेमाची जातकुळ खुपच अनोखी असते.

आयुष्याचं दान कधी उजवं तर कधी डावं, सारं नियतीच्या हातात. मिळालेल्या दानाचा हंसतमुखाने स्वीकार करत, जिवलगाचा हात हाती घेत केलेली वाटचाल, वाट्याला आलेली सुखदु:ख, प्रसंगी परिस्थितीशी केलेली हातमिळवणी तर कधी तिच्याशी केलेले दोन हात सारेच क्षण परस्परांवरील प्रेमाची वीण घट्ट करणारे ठरतात आणि वयाच्या पन्नाशीपर्यंत अतिशय जवाबदार असं प्रेम आकाराला येतं. हे प्रेम उबदार असतं, सुरक्षित असतं, हवंहवंसं वाटणारं असतं, गुंतलेपणातली तृप्ती ल्यालेलं  असतं.

सारी वेडी वाकडी नागमोडी वळणं पार करत गतीशील होत जाणारं आयुष्य आणि त्या त्या टप्प्याला फुलणारं आणि परिपक्व होत जाणारं प्रेम अंतिम टप्प्यावर एक वेगळीच उंची गाठतं. ह्या प्रेमाची भाषा मूक असते, समंजस असते, शब्दांच्या आधाराशिवायच व्यक्त होण्याची कला त्याला अवगत झालेली असते, फक्त आणि फक्त नजरेच्या टप्प्यात जिवलगाचा वावर असावा एवढी माफक अपेक्षा हे प्रेम बाळगून असतं. आशा, अपेक्षांच्या पलिकडे गेलेलं हे प्रेम निर्वाणाच्या वाटेवर इंद्रधनुषी साजात झगमगत असतं!

© ज्योति हसबनीस, नागपूर

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

3 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

बहुत-बहुत बधाई हो आपको, बहुत अच्छा लिखा है

ज्योति हसबनीस

धन्यवाद मीनाक्षीजी !

Radhika

अति सुंदर !