सुश्री ज्योति हसबनीस
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
(प्रस्तुत है सुश्री ज्योति हसबनीस जी का रोचक आलेख तो तेथे तू माझा सांगाती हमें बताता है कि कैसे मोबाइल हमारे जीवन का एक महत्वपूर्ण अंग बन गया है और हम उसके बिना कितने अपूर्ण हैं ?)
बागेला पाणी घालता घालता आज मी हेच गुणगुणत होते. आणि जशी मी रंगून गेले ना तशी नजरेसमोर माझा सांगातीच फेर धरू लागला. माझा सांगाती ..माझा मोबाईल !! हो..विश्वास बसत नाहीय ना ..माझा माझ्यावरही विश्वास बसत नाहीय ..पण अगदी खरं तेच सांगतेय ! अगदी गाता गाता ‘सांगाती’ ह्या शब्दाशी मी अडखळले आणि जणू मला साक्षात्कारच झाला ! सांगाती ह्या शब्दाचा खराखुरा अर्थ मला उमगला !
अक्षरश: जिथे जाईन तिथे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी येणारच माझ्या बरोबर तो ! कधी एखाद्या नम्र सेवकासारखा उशा पायथ्याशी निमूटपणे बसणार, तर एकांतात सारं जग पुढ्यात टाकून ‘काय प्रिय करू गं मी तुझं’ करत माझ्या हातचं बाहुलं बनत बघ्याची भूमिका घेणार ! एकाग्रपणे काही वेगळं करू म्हंटलं तर सारखा साद घालणार, जणू ओरडूनच सांगतोय जसा ‘बघ तरी कोण आलंय तुला भेटायला, ‘काय आणलंय बघ तरी, ‘अगं काय म्हणणं आहे ते तरी बघ जरा डोकावून .. ! ‘अक्षरश: लहान मुलासारखं लक्ष्य वेधून घेणार, भंडावून सोडणार, आणि हातातलं काम टाकून एकदाचा जवळ घेतला की जिवाला निवांतता … त्याच्या आणि माझ्याही ..! हो कधी कधी मुकाट बसवावंच लागतं त्याला, किती सारखा सहन करायचा त्याचा टणटणाट !
त्याला न घेता बाहेर जायची काय बिशाद ! सारे रस्ते, पत्ते, फोन नंबर्स, माझ्यापेक्षा यालाच पाठ ! माझ्यापेक्षा तीक्ष्ण याचे डोळे, तल्लख याची स्मरणशक्ती, आणि उत्तुंग बुद्धीची झेप ! इकडून तिकडे सांगावा धाडण्याचा वायूवेग तर विचारूच नका ..साऱ्याचंच कौतुक करावं तेवढं थोडंच ! महत्वाच्या भेटीगाठीच्या वेळा, औषधाच्या वेळा, एकवेळ मी विसरेन पण हा पठ्ठा नाही विसरणार ! ती वेळ वेळेवारी पाळण्यात, साधण्यात याचा वाटा लाख मोलाचा ! दऱ्या , खोऱ्या , समुद्र किनारे किर्रजंगल ,सगळीकडे हा माझ्याबरोबर असणारच ! मी डोळ्यात साठवण्याआधीच सारं काही टिपायची याला कोण घाई ! याच्या या घाईपायी कित्येकदा सारं नीटपणे डोळ्यात साठवायचं पण राहून जातं आणि थोडी चुटपूट लागते जिवाला ! मनस्वी संताप येतो त्याच्या अगोचरपणाचा आणि स्वत:च्या धांदरटपणाचा देखील ! पण मग कधीतरी याने गोळा केलेला खजिना न्याहाळतांना अपार कौतुक मनात दाटतं, त्याच्या एकनिष्ठपणाची साक्ष पटते, आणि उगाचच रागावतो आपण याच्यावर म्हणून मन खंतावतं देखील ! कधी मनात काही दाटून आलं की सारं ह्याला सांगून मी मोकळी ! अगदी सगळी माझी स्पंदनं तोही तितक्याच असोशीने अनुभवणार आणि क्षणार्धात माझ्या सख्यांपर्यंत ती तशीन् तशी पोहोचवणार. संवाद राखला जाणं याचं पुरतं श्रेय या तत्परतेने सांगावा धाडणाऱ्या माझ्या सांगात्याला ! सकाळी कितीही वाजता उठायचं असलं तरी ‘तूच उठवशील रे’ असा माझा लाडिक हट्ट असतो त्याच्याजवळ ! मंद मंद संगीत ऐकत हळूच डोळे उघडावेत, काही क्षण परत ते सूर कानामनात साठवून घेत डोळे अलगद मिटावेत असा नित्यक्रमच ठरवून टाकलाय मी.. !
अरे हो ! एक तर सांगायचंच राहिलं.
चिमुरड्या नातींना सोबत करण्यात, त्यांना अंगाई म्हणून झोपवण्यात, आवडती गाणी गोष्टी, व्हिडिओ दाखवण्यात काय interest घेतला ह्या माझ्या दोस्ताने ! तिथे जर तो माझ्या सोबत आला नसता ना तर मग मात्र माझी काही खैर नव्हती…! अवखळ नातींचे मनस्वी हट्ट पुरवणं तर माझ्या आवाक्याबाहेरचंच झालं असतं !
आणि अजून एक, जरा आतली गोष्ट सांगते हा माझा दोस्त अगदी सावलीसारखा पाठीराखा,
आणि म्हणूनच माझ्या जोडीदाराचा अगदी कडवा प्रतिस्पर्धी ! ह्याची माझ्याशी वेळी अवेळीची जवळीक हा एक वादाचा ज्वलंत विषय ..कायम धगधगता ..!ठिणगीच पडू दे की वणवा पेटलाच म्हणून समजा …
तर असा आहे हा माझा सांगाती, जिथे मी जाते तिथे हा असतोच! आणि मी कसली चालवतेय त्याला, तोच मला चालवतो, साऱ्या जगाची सैर करवतो, अक्षरश: सुखात आणि निवांत असते मी त्याचा हात धरून ..!!
© ज्योति हसबनीस, नागपूर