सुश्री ज्योति हसबनीस

दुर्दम्य

(प्रस्तुत है  सुश्री ज्योति  हसबनीस जी   की  एक भावुक लघुकथा दुर्दम्य। )

एssss सुनंदाsss अत्यंत चिरक्या आणि घोगऱ्या आवाजातली हाक आणि त्या पाठोपाठ दणदण पायऱ्या उतरणारी मोंगोल वळणाची , उमलू घातलेली, घट्ट दोन वेण्यांचे हेलकावे मिरवणारी मुलगी आणि तिच्या उतरण्याकडे अनिमिष नजरेने बघणारा जिन्याच्या पहिल्या पायरीवर असलेला पूर्ण पुरूषाच्या वाटेवरचा मोंगोल चेहरेपट्टीचा मुलगा ..काळजात चर्रर्र झालं ते दृष्य बघून ! मतिमंद म्हंटलीत तरी निसर्गाने आपलं काम चोख बजावलं होतं. शारीरिक बदलाची चाहूल आणि प्रीतीची कोवळीक नजरेत उतरली होती. पण ह्या साऱ्याचं रूपांतर कशात होणार ह्या जाणीवेने मात्र माझं मन सुन्न झालं, आणि झर्रकन् भूतकाळात गेलं.

माझ्या कळत्या वयात एक कुटुंब आमच्या घराशेजारी राहायला आलं होतं. त्या कुटुंबात एक छोटा मुलगा आजूबाजूच्या समवयस्क मुलांच्या टिंगल टवाळीचा विषय झाला होता. त्याला आपल्यात खेळायला घेणं तर दूरच पण त्याच्या बोलण्यावर हंसणं, त्याच्यावर उगाचच दादागिरी करणं, त्याला चिडवणं हा त्या मुलांचा दिनक्रम ठरलेला. शेवटी वैतागून आईचं त्याला घरात डांबून ठेवणं आणि त्याने आसुसून खिडकीतून मुलांचे खेळ बघणं हे त्याने स्विकारलं होतं. काहीच दिवसांत त्यांची परत दुसऱ्या गांवी बदली झाली आणि माझ्याही मनातून हळूहळू त्याची खिडकीतली आसूसलेली नजर, आणि लाळभरला चेहरा पुसट तर झाला. पण मतिमंद मुलांच्या आयुष्याबद्दल एक प्रकारचं कुतूहल मात्र निर्माण झालं.

मतिमंद मुलांची शाळा आणि लागून असलेलं वर्कशाॅप नेहमीच खुणवायचं मला. आतल्या जगाबद्दल एक प्रकारची उत्सुकता मनात असायची. कसं असेल ते जग, काय वय असेल त्या जगाचं, काय चौकट असेल तिथल्या शिस्तीची, आपसात खेळत वाढत मैत्रीचे धागे गुंफले जात असतील का, की कुठलीही गोष्ट आकलनाच्या अल्याड अथवा पल्याडचा टप्पा गाठता न आल्यामुळे सारं जगच गोठल्यासारखं झालं असणार ?

खरंच बधीर व्हायला झालं होतं मला असंख्य विचारांनी !

मुख्य प्रवाहात आपलं मूल न सोडता त्याचं वेगळं स्वतंत्र अस्तित्व समर्थपणे जपत, दुर्दम्य आशावादाचं खतपाणी घालून त्या अस्तित्वाला अर्थ देण्याचा प्रयत्न करणारे कितीतरी पालक त्या शाळेत मी बघितले. त्या दुर्बल मनस्क मुलांना शारीरिक आणि बौद्धिक क्षमतांची जाणीव करून देण्यासाठी राबराब राबणारे, आपुलकीने त्यांच्याशी वागणारे कितीतरी स्निग्ध चेहरे मला चकित करून गेले. थोड्याफार फरकाने एकसारखाच बुद्ध्यांक असलेली केवळ आकाराने वाढलेली लहान-मोठी मुलं काळजात एक कळ उमटवून गेलीत. त्यांचे आपसातले खेळ, विशिष्ट आवाजातलं न कळणारं आपसातलं संभाषण, निर्विकार चेहऱ्यावरचे शून्यातले डोळे, लाळेची संततधार, सारं मुख्य प्रवाहाच्या अगदी विरूद्ध दिशेने जाणारं भासत होतं. पण त्याच वेळी मुख्य प्रवाहात त्यांना मिसळता यावं, ह्या जगाचा एक भाग आपणही आहोत ह्याचं आत्मभान त्यांना यावं, समर्थपणे आपल्या पायावर उभं राहण्याइतपत सक्षमता त्यांच्यात यावी म्हणून विविधांगांनी कसून मेहनत घेण्याची तिथल्या संस्थेची जिद्द बघितली आणि मनोमन हात जोडले मी त्यांच्या चिकाटीला ! आणि मनोमन हात जोडले मी पालकांच्या दुर्दम्य आशावादाला आणि अंगभूत सजग पालकत्वाला!!

थोडा वेळच त्यांच्या सान्निध्यात मी राहिले पण मन अगदी विषण्ण झालं. उदास झालं . नैराश्यानं घेरलंच मला. आयुष्याची ही बाजू कधी मी फारशी जवळून बघितलीच नव्हती, पुसटशी ओळख ह्या जगाशी कधीतरी झाली होती पण काळाच्या प्रवाहात ती कधीच मागे पडली होती. खरंच त्या क्षणी नियती माणसाला हातचं बाहुलं करून ती त्याच्याकडे बघत विकट हास्य करतेय असा भास झाला मला आणि त्याचक्षणी तिच्या कचाट्यातून झुंजारपणे स्वत:ची सुटका करून विजयी स्मित करणाऱ्या शूर माणसाचा साक्षात्कारही झाला मला ! पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे जरी खरं असलं तरी वाट्याला न आलेल्या उजव्या दानाने हताश न होणारा ‘पुत्र मानवाचाही’ तितकाच खरा ! आयुष्याची घडी नीट नेटकी बसविण्यासाठी अविरत झटणाऱ्या  माणसाच्या ह्या झुंजार वृत्तीला लाख लाख सलाम !

© ज्योति हसबनीस

नागपूर

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments