मराठी साहित्य – मराठी कथा – *अपुरे घरटे* – श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
*अपुरे घरटे*
(इस अत्यंत शिक्षाप्रद एवं हृदयस्पर्शी लघुकथा के लिए श्रीमति रंजना जी की लेखनी को सादर नमन)
सकाळची वेळ होती कोवळे ऊन पडलेले होते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होतं.
आज मंगळवार बाजारचा दिवस असल्यामुळे मजूर लोकांना कामाला सुट्टी होती. ओळखीचे एकजण सुट्टीच्या दिवाशी “काही काम आहे का ताई” विचारायला आले . काय काम सांगावे हा विचार करत असतानाच, घराच्या दोन्ही बाजूला बाभळीच्या फांद्या मधे डोकावणाऱ्या फांद्या दिसल्या. येताजाता त्यांचे काटे अंगाला टोचत असत. ” मामा याच्या मधे आलेल्या फांद्या कट कराल का?” “हो करतो की ताई” असे म्हणून ते कुऱ्हाड आणायला निघून गेले आणि मी शाळेला गेले.
चार वाजता येऊन पाहिले आणि त्याला फांद्या तोडायला सांगून अक्षम्य अपराध केल्यासारखे वाटायला लागले .
कारण डेरेदार वाढलेल्या बाबळीच्या प्रत्येक फांदीवर सुगरणींचे अनेक घरटे जवळजवळ शेवटच्या टप्प्यावर आलेले होते जवळपास एक महिन्याच्या अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करून ते बिचारे जीव घरटे तयार करत होते.
मुख्य म्हाणजे पोर्च मधे बसून त्यांची कारागीरी पाहणे हा माझ्यासाठी आवडता छंदच बणलेला होता. काडी काडी जमवून घरटे तयार करणारे सुगरण पक्षी पाहून एक नवीन चैतन्य मनात संचारत असे, परंतु मात्र मन पुरतं कोलमडून गेलं होतं. या नराधमाने त्या बाभळीच्या सर्वच्या सर्व फांद्या तोडून त्यावरील घरटे मुलांना खेळायला देऊन टाकले होते. या माणसाचं काय करावं तेच कळत नव्हतं
जातायेता टोचणाऱ्या काट्यां पेक्षा शेजारच्या झाडावरून पाहणाऱ्या दहाबारा सुगरणींच्या नजरा आज मला जास्तच टोचत होत्या.
आपण याला फांद्या तोडायला सांगून फार मोठा गुन्हा केला आहे असं सतत जाणवत होतं. पुढचे दोन दिवस पक्षांची हालत पाहावी वाटतच नव्हती. परंतु नंतर मात्र ते सारे नवीन घरट्याच्या तयारीला लागले. परंतु आजही झाडाकडे पाहिले की ते अपुरे घरटे चटका लावून जाते.
तात्पर्य :- काम करणाऱ्याची वैचारिक कुवत लक्षात न घेता इतरांना गृहीत धरून काम सांगितले की असे अनर्थ ओढावतात, मग पश्चात्ताप करूनही काहीच उपयोग नसतो. त्यामुळे संभाव्य धोके लक्षात घेऊन स्पष्ट सुचना देणे फार महत्वाचे असते.
© श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105