श्री सुजित कदम
☆ शिकवण ☆
(श्री सुजित कदम जी की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं। इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं।)
काल खूप वर्षांनंतर एक ओळखीचे काका भेटले, मस्त गप्पा मारल्या…!
मला म्हटले ,”काय करतोस..?” मी म्हटलं…”.छोटसं दुकान आहे…”
मी काही बोलायच्या आधीच.. त्यांनी बोलायला सुरुवात केली..;
”ह्या सोसायटीत माझा मोठा फ्लॅट आहे..,
घरात धुणं भाड्यांला कामवाली आहे..,
फोर व्हिलर ही आहे..; पण ह्या वयात चालवायला भिती वाटते, आम्ही दोघंच असतो बघ इथे रहायला…!
पेन्शन मध्ये जेवढं भागवता येईल तेवढं भागवतो .
मोठा मुलगा अमेरिकेत असतो…
दुसरा मुलगा ईथे जवळजच राहतो …,
दोघांनाही त्यांच्या मनासारखं शिकवलं..
आता ते दोघेही *वेल सेटल* आहेत…”
काका मनसोक्त बोलत होते मी ऐकत होतो…,
”वर्षां दोन वर्षांनी मोठा अमेरिकेतून मुलगा येतो भेटायला.. काही दिवस राहतो.. त्याची इथली कामे झाली की विचारतो, ” किती पैसे देऊ? ”
”बेटा पैसाच आता आमच्यातला दुरावा बनत चाललाय बघ. आमच्या गरजा आता भावनिक आहेत. ”
”दुसरा मुलगा खूपच बिझी असतो त्याला तर अजिबात वेळ मिळत नाही… मीच दिवसभर एखादी चक्कर मारतो त्याच्याकडे..!”
“मुलं मोठी झाल्यावर… थोडं आपणच समजून घ्यायला हवं..आपणच..,मुलांना आभाळ मोकळं करून दिलंय किती उंच उडायचय हे त्यांच त्यांनी ठरवायचं….;फक्त उडताना त्यांनी घरचा रस्ता विसरू नये एवढंच…!”
“बरं माझ सोड …
तू सांग तूझ कस चाललय …?
मी म्हटलं..” छान चाललयं….”
“दोन मुलं आहेत… लहान आहेत अजून..”
यावर ते म्हणाले , “वाह… छान..
त्यांना ही आभाळ मोकळ करून दे…!
तुझ्या मुलांना ते म्हणतील ते सारं काही दे पण दुसर्या साठी वेळ द्यायचा असतो हे देखील शिकवता आलं तर जरूर शिकव या नव्या पिढीला. . . !
तुझ्या लेकरांना दैदीप्यमान भरारी घेण्यासाठी दशदिशा खुल्या करून दे पण त्यांना घरी परतण्यासाठी रस्ता मात्र एकच ठेव…;
पुस्तके वाचायला शाळेत शिकतीलच . . पण या दुनियेत जगण्यासाठी माणसं वाचायला शिकव. म्हातारपणी आधार हवा असतो बेटा. . डेबिट कार्ड नको असतं . . आपल माणूस आपल्या शिलकीत पाहिजे. . . यशोकीर्तीच्या घडणावणीत आपल लेकरू आपल रहात नाही आणि मग सुरु होतं वाट पहाणं.
तुझ्या मुलांना पैसा कमवायला आणि प्रेम वाटायला शिकव म्हणजे मग माझ्यासारखी तुला वाट पहावी लागणार नाही…! ”
© सुजित कदम, पुणे