श्री कपिल साहेबराव इंदवे
साहित्यिक प्रवास-
उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक म्हणुन लेखकाची ख्याती आहे. विविध सामाजिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग. पाणीटंचाई, वाढत चाललेली बेरोजगारी, विविध सामाजिक प्रश्न व हल्लीची राजकारणाची स्थिती यावर लेखक आपले स्वतंत्र मत मांडतात. लेखकाने अनेक कथा लिहील्या असुन. त्यांच्या लेखन शैली आणि कविता पाहुन ” *काव्य स्पंदनी माझी कविता*” या प्रातिनिधिक काव्य संग्रहात प्रकाशकांनी त्यांच्या कवितांची दखल घेतली आहे. विविध कवी संमेलन, विद्रोही साहीत्य संमेलन यातुन लेखकांनी कविता सादर करतांना लेखकांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. येत्या अल्प काळात ते आपला कविता संग्रह प्रकाशित करण्याच्या मार्गावर आहेत.
☆ पबजी ☆
“अरे मार त्याला मार मार” रोहित जोरात ओरडला. सकाळची वेळ होती. सगळेजण अजुन झोपलेले होते. रोहित पलंगावर तर आई बाबा आणि समिर खाली जमीनीवर झोपले होते. त्याच्या अशा ओरडण्याने आई बाबा आणि समिरही झोपेतून झटकन उठले. आईचं ह्रदय त्या आरोळीने हादरलं होतं. ती उठताच त्याच्या जवळ गेली. आणि त्याच्या अंगावरचे पांघरून हळुच काढले.” काय झालं बाळं” अस काळजीपूर्वक विचारले. पण त्याच्या हातात मोबाईल आणि कानात इयरफोन होते. तो पबजी खेळण्यात दंग होता. त्याच्या अंगावरचं पांघरून काढलं म्हणुन तो आईवर चिडला. “अगं आई तुला काय गरज आहे पांघरून काढण्याची. तुला तुझं काम नाही करता येत का?” त्याचं असं रागावून बोलणं पाहुन ती बिचारी मागे झाली. तो आपल्या पबजी खेळण्यात दंग झाला.
झोपमोड झाली म्हणुन समिरही आईवर रागावला. “आई याला सांग हं असं ओरडत जाऊ नको म्हणुन विनाकारण ओरडतो आणि दुस-या लोकांना परेशान करतो” ती बिचारी शांतपणे ऐकत होती. “बस रे झोप आता गुमानं. मोठा आहे तो तुझ्यापेक्षा” बाबांनी त्याला दम भरला.” मोठा आहे तर मग मोठ्यासारखं वागायला लावा ना. कशाला लहान लेकरावाणी ओरडतंय” समिर हळू आवाजात अंगावर गोदडे ओढत म्हटला. त्याचंही बोलणं खरं होतं म्हणुन बाबा काही बोलले नाहीत. त्यांनी आईकडे पाहीले. तिच्याही डोळ्यांत तक्रार दिसत होती. ती स्वयंपाक घरात चालली गेली.
बाबा उठले आणि तिच्याजवळ गेले. ते जवळ आलेले पाहुन आई म्हटली “अहो तुम्ही त्याला काही म्हणत का नाही. मोठा झालाय तो आता. शिकला नाही तरी काय झाले. काहीतरी चांगल्या कामाधंदयाला लावा ना त्याला. दिवसभर नुसता पबजी खेळत बसतो. आणि तो धाकटा टिकटाॅकवर व्हीडीओ बनवत असतो. कंटाळा आला त्याचा. काय मिळतं त्यांना त्यात देव जाणे” “मी बोलतो त्याच्याशी. तु काळजी करू नकोस” बाबानी तिला धीर दिला. आणि रुमाल घेउन अंघोळीला चालले गेले. ते अंघोळ करून बाहेर आले. तोपर्यंत चहा बनला होता. ते पलंगावर जाऊन बसले. रोहित अजुनही पबजी खेळत होता. आईने बाबांना चहा दिला. आणि रोहितला म्हटले “रोहित उठ आणि चहा घे लवकर” रोहितने मोबाईल उशावर ठेवला. आणि कंटाळून उठला आणि तसाच आवाजात बोलला “हो आई” आणि उठून ब्रश करायला गेला. आई समिरलाही म्हटली “तुला काय वेगळं आमंत्रण द्यावं लागेल का रे उठ तु पण. दिवसभर मोबाईल मध्ये अडकून राहता. आणि सकाळी दहा वाजेपर्यंत झोपता.” असं म्हणुन ती स्वयंपाक घरात गेली. रोहित ब्रश करून आला. आईने त्यालाही चहा दिला. आणि भिंतीजवळ उभी राहीली. बाबा चहा घेत होते. आईने त्यांना डोळ्यांनीच इशारा केला. बाबा तिचा इशारा समजले. आणि चहाचा एक घोट घेत रोहितला म्हटले. “किती दिवस चालणार हे सगळं” रोहितला ते कळलं नाही. “काय” तो उद्गारला. बाबा “रोहित तु आता मोठा झाला आहेस. काही घराची काळजी घेणार आहेस कि नाही. किती दिवस ते मोबाईल मध्ये बोटं खुपसणार आहेस” रोहितला बाबांच्या बोलण्यातला सार कळला. बाबा बोलत होते “तु शिकला तर नाहीच. पण आता एखादं काम बघुन घरखर्चाला मदत करणार आहेस कि नाही. तुझं लग्नही करायचेय पुढे त्यासाठी थोडी बचत नको का करायला. दिवसभर नुसता पबजी, टिकटाॅक काही कळत नाही मला तुमचं. तो लहान आहे तो काय आदर्श घेईल तुझा” रोहितला डिस्टर्ब केलं म्हणुन तो आधीच चिडलेला होता. त्यावर अजुन सकाळी सकाळी रामायण म्हणुन तो अधिकच चिडला. “काही पण घेऊ दे आदर्श. तो कुठे एकतो माझं काही. काही बोललं तर उलट फिरून बोलतो तो. मला काही सांगू नका आणि हे असं टोमणे मारणं बंद करा.”
बाबांनी पुन्हा त्याला समजावले. “अरे बाबा. तुला टोमणे नाही मारत आहोत. तुला घरची जबाबदारीची जाणीव करून देत आहोत. तो लहान आहे त्याला काय सांगणार मी.” बाबांचा चहा संपला होता. त्यानी हातातला कप बाजूला करत म्हटले. रोहित- “मग मी काही काम शोधत नाहीये का? मी काय रिकामा बसुन आहे. काम मिळत नाही त्याला मी काय करणार?” आणि रागातच त्याने अर्धवट पिलेला चहाचा कप जोरात खाली ठेवला. आणि झपाटयात बाहेर निघुन गेला. बाबा त्याच्या या अगतिक वागण्याकडे बघतच राहिले. ज्यांच्या खांद्यावर जबाबदारीचे ओझे टाकायचे होते. जे हात त्यांना मदतीला हवे होते त्या हातांवर मोबाईलने कधीच कब्जा जमवून घेतला होता. ते पाहून त्यांचे डोळे पाणावले. पण त्यांनी ते कसेबसे लपवले. पण आईच्या नजरेतून सुटले नाहीत. ती ही अधिर होऊन बघत राहिली.
© कपिल साहेबराव इंदवे
मु पो. मा. मोहीदा त श , ता. शहादा जि. नंदुरबार
मोब. 9168471113