मराठी साहित्य – मराठी कथा / लघुकथा – * तरूणाई * – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

तरूणाई

(प्रस्तुत है  सुश्री ज्योति  हसबनीस जी   की लघुकथा तरूणाई। )

‘आई मैत्री वेगळी, आणि व्यवसाय वेगळा’. व्यवसायात माझा पार्टनर म्हणून जरी आता तो राहिला नसला तरी आमच्यातली मैत्री तर तशीच आहे आणि तशीच राहणार. मित्र म्हणून तो आजही मला तितकाच आवडतो. नाही जमलं त्याला धंदा सांभाळणं, नाही मानवलं आम्हाला त्याचं व्यवसायाकडे दुर्लक्ष करणं. नविन नविन व्यवसाय, झोकून देऊन काम करून सुरूवात केली खरी आम्ही सगळ्यांनी, पण नाही राखता आलं त्याला उत्साहातलं सातत्य, देखरेखीतली जागरूकता, हिशेबातली सतर्कता! जाण असूनही नाही पेलता आली जवाबदारी, पण म्हणूनच दिला ना त्याला डच्चू! आम्हीच एकत्र बघितलेल्या स्वप्नाच्या मनोऱ्याचा एक खांब खणून बाजूला फेकतांना कोण यातना झाल्या आम्हाला, पण व्यवसाय सुरळीत चालावा, धंद्याला रूप यावं, म्हणून मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतला, आणि योग्य वेळी निर्णय घेतल्याचा समाधानाचा सुस्कारा देखील सोडला. पण याचा अर्थ असा नाही ना होत की पार्टनरशीप बरोबर दोस्तीचाही शेवट झालाय! अगं कधीही काही सल्ल्याची गरज भासली , तर आम्ही धाव घेणारच त्याच्याकडे! अगं काय सुपीक डोकं आहे त्याचं, काय भन्नाट कल्पना असतात त्याच्या, हा आता थोडा भरकटलेला असतो , पण असतातच अशी ही creative लोकं  थोडी भरकटलेली, त्यांचं जगही वेगळं, आणि त्यात रमण्याच्या त्यांच्या कल्पनाही वेगळ्या! चल निघतो मी, एक काम दिलंय त्याला, बघतो झालं का final ते! ‘फटाफट माझ्या प्रश्नाला उत्त्तर देत, की मला गप्प बसवत माझ्या प्रश्नार्थक मुद्रेची जराही फिकीर न करता, असंख्य विचारांच्या भोवऱ्यात मला एकटीला गरगरत सोडून बाईकला किक मारत झूम्मदिशी तो गेला सुद्धा!!

वयाच्या सव्वीसाव्या वर्षी विचारांची एवढी स्पष्टता आपल्यात होती? असली तरी ती इतक्या स्पष्टपणे मांडण्याची ताकद आणि पारदर्शीपण आपल्यात होतं? व्यवसाय आणि नात्यांची गल्लत न करता दोन्हीचा तोल सांभाळत जीवनाचा ताल बिघडू न देण्याची मानसिकता आपल्यात होती? मुळात नाकासमोर चालत, एका comfort zone मध्ये वावरण्याची सवय लावून घेत आयुष्य गेलं आपलं, वेगळी वाट चोखाळणं तर मनाला शिवलं देखील नाही आपल्या! आणि त्या पार्श्वभूमीवर मनात असेल तेच करणारी , ईप्सित साध्य करण्यासाठी जिवाचं रान करणारी ही तरूणाई खुप वेगळी भासली मला! वेगवेगळ्या क्षेत्रांत पावलं टाकतांना, चालीतला वेग, तिची लय बिघडू न देता कायम राखणाऱ्या ह्या तरूणाईचा,  त्यांच्या आत्मविश्वासाचा मला खुप अभिमान वाटला त्या क्षणी ! स्वतंत्रपणे व्यवसाय उभारून भक्कमपणे पाय रोवू बघणारी ही दमदार तरूणाई मला खुप काही शिकवून गेली.  माझ्या बुरसट आणि कोत्या विचारांचा धुव्वा उडवत मनाचा अगदी स्वच्छ उपसा करणारी ही तरूणाई एका वेगळ्याच तेजाने झळाळत असलेली मला जाणवली!

विचारांचं वादळ शमलं होतं. डोळ्यातल्या प्रश्नचिन्हाची जागा आता  अपार स्नेहाने घेतली होती, कपाळावरच्या आठ्या पार विरल्या होत्या, चेहऱ्यावर कौतुक आणि आनंदाचं तृप्त हास्य पसरलं होतं, आणि मनात फक्त ‘शुभं भवतु’ चे हुंकार निनादत होते.

© ज्योति हसबनीस