सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 153
☆ पसारे… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
(वृत्त- भुजंगप्रयात)
कसे सांग हे सावरावे पसारे
किती काळ मी वागवावे पसारे
कशा स्वच्छ होतील सांदीफटीही
कळेना कसे घालवावे पसारे
इथे अंगवळणी पडावे कसे हे
जुने जाणते हाकलावे पसारे?
दिवाळीत जातात माळ्यावरी अन
पुन्हा वाटते साठवावे पसारे
असे वेंधळेपण सदासर्वदाही
कुणी का असे लांबवावे पसारे
मनाला मुभा मुक्त संचारण्याची
कुठेही कुणी पांघरावे पसारे
कुणा शल्य सांगू जिवीच्या जिवाचे
प्रभा वाटते आवरावे पसारे
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈