सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 156
☆ लावणी – 1 ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
कार्तिकातली थंडी गुलाबी अंगावर काटा आला
अन् राया मला प्रीतीचं पांघरुण घाला ॥
सुना गेला दिवाळी सण
कानी आली अशी कुणकुण
अटकाव झालाय चहूबाजूनं
सणासुदीला नाही आला
माझा शिणगार वाया गेला ॥
हाती हिरवीगार कांकणं
पायी रूणझुणते पैंजण
मी हिरकण तुम्ही कोंदण
जीव वेडापिसा हा झाला
धाडला सांगावा तरी नाही आला ॥
लाखमोलाचं तुमचं येणं
माझं एवढंच एक सांगणं
नाही शोभत असं वागणं
मी पैठणी अन तुम्ही शेला
गाठ बांधलेली विसरून गेला ॥
काय नातं तुमचं नी माझं
तुम्ही तुमच्या मनाचं राजं
येण होईल का आजच्या आज?
जणू गुन्हाच की हो घडला
हा जीव तुम्हावरी जडला ॥
कार्तिकातली थंडी गुलाबी अंगावर काटा आला
अन राया मला प्रीतीचं पांघरुण घाला ॥
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
धन्यवाद हेमंत सर आणि संपादक मंडळ 🙏