सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 159
☆ नातं ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
“अकारणच जवळीक दाखवली!”
असे वाटून जाते,
आजकाल!
निष्कारणच Attitude दाखवत,
निघून गेलेली ती…..
रिक्षात बसल्यावर ,
कसा करेल इतक्या प्रेमाने आपल्याला हात??
हे लक्षात यायला हवं होतं !
पण प्रतिक्षिप्त क्रियेसारखा….
उंचावला जातो हात…
पण तिचं पुढचं वाक्य ऐकून जाणवतं,
अरे, ती इतर कुणाशी बोलतेय,
आपल्या पाठीमागे असलेल्या !
किती फसवी असतात ना,
ही नाती??
काल परवाच सांगितले,
गूज मनीचे,
पाश असतात कुठले, कुठले !
शेअर केल्या काही गोष्टी,
की , शांत होते मन!
आणि गळामिठी घातलीच जाते,
त्या “हमराज” मैत्रीणीला !
पण नाती रहात नाहीत
आता इतकी निखळ,
पूर्वीही व्हायच्याच कुरबुरी…भांडणं
रूसवेफुगवे!
…..पण आजकाल दर्प येतात,
अहंकाराचे!
याच प्रांगणात खेळ सुरू झाले होते…
पण “जो जिता वही सिकंदर”
म्हणत पहात रहायची लढाई,
बेगुमान!
या युद्धात सहभागी व्हायचेच
नसतेच खरेतर!
पण युद्ध अटळ मैत्रीतही !
जो तो समजत असतो,
स्वतःला रथी महारथी ! ….नसतानाही !
आपण सांगून टाकतो
आपले अर्धवट ज्ञान…
म्हणूनच आपला होतोच,
अभिमन्यू!
मैत्रीच्या नात्यातही !
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
👌👌👌