सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 161
☆ मनमुक्ता ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
मुक्त मनोमनी झाले
तरी का गुंतते आहे
पुन्हा हे स्वप्न सांजेला
अवेळी साकारताहे
जरी ना नीज डोळ्यात
पहाटे लागतो डोळा
खरी होतात ही स्वप्ने
सजे स्वप्नात पाचोळा
जरी ही तृप्तता आली
स्वतःला सांगते आहे
कळेना कोणता रस्ता
आता धुंडाळते आहे
पसारे आवरावे की
करावी संन्यस्त भाषा
कशी मी शिस्त लावावी
अशा बेशिस्त आयुष्या
मनाच्या एकांत वेळा
हव्याशा वाटतानाही
कुणी का ओढते आहे
मला गर्दीत आताही
असे अस्तित्व इवले
जणू मुंगीच छोटीशी
भरारी घ्यायची आहे
अखेरी याच आकाशी
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈