सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 162
☆ नाताळ 🎄⛄🌈 सुश्री प्रभा सोनवणे ☆
(२५ डिसेंबर २०२२)
नाताळ दरवर्षीच येतो,
मनाच्या पोतडीतून,
“नाताळबाबा” काढतो
तशा निघतात सुंदर ,
सुंदर आठवणी !
लहानपण येतं परतून अलगद!
चर्च कम्पाऊंड मधली
तुझी छोटीशी बंगली …
नेहमीच स्वच्छ, नीटनेटकी….
नाताळ मधे सुशोभित…अधिक देखणी!
तुला आवडायचा आमचा ,
संक्रांतीचा सण,
तसाच तुमचा नाताळ..मला पण !
कोप-यातला तो “नाताळवृक्ष”,
डोनट, केक, पुडिंग!
येशूची प्रार्थना….
चर्च च्या घंटेचा नाद…
सारं आठवतंय आज,
काल परवा सारखंच!
तू नाहीस पण .
तुझ्या आठवणी आहेत सखये,
निरंतर !
आणि माझा प्रत्येक नाताळ,
तुझ्या आठवणींनी सजलेला !
शाळेत असताना पाठ्यपुस्तकात
वाचलेल्या वसंत बापटांच्या—
“नाताळ” या धड्यातल्या,
“स्टेला” सारखीच तू…
चिरंतन,
चिरतरुण…..
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
धन्यवाद हेमंत सर आणि संपादक मंडळ 🙏🙏🙏