श्री सुजित कदम
स्वप्नातलं घर…!

 

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं। प्रस्तुत  है उनकी नवीनतम कविता स्वप्नातलं घर…!)

घराच्याही स्वप्नातलं घर
विसरली आहेत माणसं.
चार भिंतीत मुकी राहू,
लागली आहेत माणसं
चार भिंतींच्या घराचं
गणित आता बदललंय,
चार भिंती एक छप्पर
नावापुरतंच उरलंय.
येण्याजाण्यासाठी घराला
दार तेवढं ठेवलंय.
“येता जाता बंद करा”
हे लेबल त्यावर लावलंय.
खिडकी मधून नजरेत येईल
तेवढं जग साठवायचं.
मनामधलं पोरकं जग,
गॅलरीत जाऊन आठवायचं.
बोलणं फारसं होत नाही
पण भेट तेवढी नक्की होते.
एवढ्या तेवढ्या कारणावरून
विनाकारण चिडचिड होते.
कळत नाही कुणाला काही
पण, काहीतरी हरवलंय.
मना मनातलं अंतर आता
नको इतकं वाढत चाललंय.
कामावरचं टेंशन आता
रोज सोबत घरात येतं.
दारामधून आत बाहेर
वार तेवढं वाहत राहतं.
आपापल्याच नादात इथे
प्रत्येक जण बिझी असतो.
टिव्ही समोर असतानाही
मोबाईलमध्ये डोकावत बसतो.
सारी नाती आता एका
मुठीमध्येच बंद होतात.
एका टच वर ऑनलाईन तर
एका टच वर ऑफलाईन होतात.
येणं जाणं कुणाचंही
सहन आता होत नाही.
घराबाहेर पडायला म्हणे
वेळ आता मिळत नाही.
सण सुध्दा हल्ली आता
चार भिंतींत साजरे होतात.
दाराबाहेरच्या चौकटी मात्र
रांगोळीसाठीच तडफडतात.
चार भिंती असल्या म्हणजे
घराला घरपण येत नाही.
फक्त घरात राहिलो म्हणजे
जगतोय म्हणता येत नाही..
©सुजित कदम
7276282626
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
रंजना लसणे

अप्रतिम लेखन सुजित दादा

बहुत-बहुत सुन्दर अभिव्यक्ति