सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 176
अस्तित्व… सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
तू नसताना उदासवाणे घर दिसते हे
अंगण, गोठा, परसबागही सुनेसुनेसे
पुन्हा परतशी वाटे आता तत्परतेने
आपोआपच दिवे लागती त्या येण्याने
☆
असणे होते खूप तुझे बाई मोलाचे
तू असताना कळले नाही महत्व त्याचे
तू गेल्यावर शांत जाहला गोठा सारा
घालत नाही कुणीच आता ओला चारा
☆
गाई गो-ही फरार झाली गोठ्यामधली
रांगोळीही कुणी रेखिना रंगभारली
तू गेल्यावर झाले आहे सारे खोटे
मंतरलेली होती आई, तुझीच बोटे
☆
© प्रभा सोनवणे
१६ मार्च २०२३
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈