सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 183
🌸 मोसम… 🌸 सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
नित्य प्राजक्ताचा सडा
मोसमात पडायचा
जाता येता पांथस्थाचा
पाय दारी अडायचा!
☆
माझ्या अंगणात होता
एक सुंदर प्राजक्त
त्याच्या सान्निध्यात वाटे
व्हावे त्याच्यापाशी व्यक्त
☆
त्याच्या सुगंधाचे असे
वेड लागले गं जीवा
फूल फूल वेचताना
वाटे स्वतःचाच हेवा
☆
पारिजात फक्त माझा
असे उगाच भासले
पहाटेस झाड माझे
कुणी लुटूनिया नेले
☆
असे असतच नाही
शाश्वतीचे सर्वकाळ
जीव उगाचच होतो
आत्मलुब्ध की वाचाळ?
☆
माझ्या दारीचा प्राजक्त
आता माझा न राहिला
कधी काळी जीव जरी
होता त्याच्याशी जडला
🌸
गेला सरून मोसम
स्वप्नवृक्ष हा विरक्त
आजकाल दिसतसे
योगी,महर्षी प्राजक्त
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈