सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 185
☆ अर्धस्वप्न… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
(मृगचांदणी मधून…)
☆
प्रतिबिंब आरशातले,
दिसते आजकाल,
प्रौढ….निस्तेज!
केसातली पांढरी बट
तारूण्य ढळल्याची साक्षी असते,
डोळ्या भोवतीचे काळे वर्तुळ
वय वाढल्याची नोंद घेते !
मन उदास पुटपुटते,
“गेले ते दिन गेले !”
पण तुझ्या डोळ्यात जेव्हा,
पहाते मी स्वतःला,
तेव्हा मात्र असते मी,
तुला पहिल्यांदा भेटले
तेव्हाची,
तरूण आणि टवटवीत!
या दोन्ही प्रतिबिंबातली
खरी कोण?
प्रसाधनाच्या आरशातली,
की तुझ्या डोळ्यातली ?
तुझ्या माझ्या नात्यातली,
सुकोमल तरुणाई,
बनवते तरुण मला,
तुझ्या डोळ्यातल्या प्रतिबिंबात!
माथ्यावर लिहून जातात
तुझे डोळे—-
“तू अर्धी स्त्री आणि अर्ध स्वप्न”
खरंच की रे —-
स्वप्न कधीच होत नाहीत म्हातारी,
त्यांना नसते मरण कधी,
स्वप्न असतात चिरंजीव,
म्हणूनच ती दोन्ही प्रतिबिंब,
होतात एकजीव!
सनातन….नित्यनूतन!
© प्रभा सोनवणे
(१ जानेवारी १९९९)
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈