सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 186
☆ धर्मवीर संभाजी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
शिवपुत्र शंभूराजे आम्हाला प्राणांहून प्रिय,
या भूमीवर सदैव राहो,
हे नाव ….अमर अक्षय!
☆
वीर,पराक्रमी,राजा अमुचा,
निधड्या छातीचा,
अखेर तो ही होता छावा,
शूर सिंहाचा….!
☆
लिहिले कोणी काहीबाही,
त्यात नसे काही अर्थ,
फुकाच का देते कोणी,
बलिदान असे व्यर्थ?
☆
किती सोसले हाल शरीराचे,
डगमगला नाही,
क्लेश, यातना, छळ सोसूनही,
शरणागत जाहला नाही!
☆
कवी मनाचा शूर वीर शंभू,
संस्कृत पंडित, “बूधभूषण” रचनाकार,
भव्य दिव्य त्या ग्रंथात होई,
देवी शारदेचा साक्षात्कार!
☆
येसूबाई महाराणी शोभली,
अनुरूप अर्धांगिनी,
ती तर होती शंभूराजांची,
सदैव शुभांगिनी !
☆
इतिहासाच्या पानांमधली….
प्रतिमा शोधू खरी,
वीर संभाजी महाराजांचे,
अल्पायुष्य लखलखते…भरजरी!!
☆
चित्र साभार – विकिपीडिया
© प्रभा सोनवणे
(१ जानेवारी १९९९)
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈