सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 215
☆ जिजाऊचे अभंग ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
जाधवांची कन्या
गाव सिंदखेड
पोर मोठी गोड
जिजाबाई ॥
*
लहानपणीच
असे पराक्रमी
बोलणे हुकुमी
कन्यकेचे॥
*
तिला लाभे वर
भोसले कुळाचा
शहाजी नावाचा
पराक्रमी ॥
*
जहागीरदार
आदिलशाहीत
परी केले हित
स्वकियांचे ॥
*
उभयतापोटी
बालक जन्मले
तेज प्रकटले
शिवाचेच ॥
*
स्वराज्याची आस
होती जिजाऊस
नेती पूर्णत्वास
बाळराजे ॥
*
“प्रभा” म्हणे माझ्या
हृदयात वसे
रायगडी दिसे
राजमाता ॥
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈