सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 217
☆ बाई ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
बाईला वागावंच लागतं बाई सारखं ,
खूप छळ झाला, सहन केली मारझोड,
तरी ती म्हणायची पूर्वी,
“पावसानं झोडलं आणि
नवऱ्यानं मारलं
दाद कुणाकडे मागायची?”
गेले ते दिवस,
ती मागते दाद,मुक्त ही होते,
घेते काडीमोड,
“मी मोडक्या संसाराची बाई लाज टाकली” !
म्हणत पाट लावते,
एखादी चिंधी – नाग्यासंगती!
पण ती बाईच असते,
ओवाळून टाकते जीव,
एखाद्या नाग्या वरून!
“आम्ही ठाकर ठाकर” म्हणणारी,
आदीवासी स्त्री मुक्तच असते ,
तरीही ती वागते बाई सारखीच,
आदीवासी असो की,
पांढरपेशा समाजातील सुशिक्षित,
-ती असते परिपूर्ण स्त्री,
आणि सांभाळते आयुष्यभर,
आपल्या बाईपणाची “चिंधी” !
बाई ला वागावंच लागतं,
बाईसारखं!
☆
© प्रभा सोनवणे
१३ फेब्रुवारी २०२४
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈