सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 226
☆ स्वप्ननगरी ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
परवाच एका मित्रानं,
बोलवलं सगळ्या मित्रमैत्रिणींना,
त्याच्या घरी,
खूप आपुलकीनं आणि आग्रहानं !
पाठवलेल्या गुगल मॅपवरून,
साधारण कल्पना आली होती,
त्याच्या उच्च – उच्चभ्रू सोसायटीतल्या,
आलिशान घरकुलाची,
मित्र वर्तुळात सारेच श्रीमंत,अतिश्रीमंत…
काही स्वकर्तृत्वावर ऐश्वर्य मिळवणारे…
तर काही “बाॅर्न रिच…”
गर्भश्रीमंतच!
बरोबरचे सारेच “मल्टीमिलीओनर”
धनाने आणि मनानेही !
पण जुना बंगला सोडून,
नव्या आलिशान सदनिकेत,
नुकतंच रहायला आलेलं
हे सारं कुटुंबच किती नम्र
आणि विनयशील !
थक्कच व्हायला झालं,
आदरातिथ्य पाहून!
सारं कुटुंबच उच्च शिक्षित,
शारदेच्याच वरदहस्ताने प्राप्त झालेली लक्ष्मी!
कुणाच्याच वागण्यात,
कुठलाचं अॅटिट्युड नाही …
जेवताना आग्रहाने वाढणारे,
तरूण हात, बाल हात,
किती सुंदर, सुसंस्कारित!
म्हटलं त्या मित्राला,
लहानपणी एक सिनेमा पाहिला होता,
“एक महल हो सपनों का”
ते स्वप्न साकारंलस तू !
संध्याकाळ ते रात्रीपर्यंतचा …
त्या वास्तूतला,
काळ खूपच सुंदर आणि सुखाचा!
ती मंतरलेली संध्याकाळ अनुभवत,
त्या स्वप्ननगरीतून बाहेर पडताना…
वाटलं पृथ्वीवरील स्वर्गच आहे हा ,
आणि
तो स्वर्ग मित्राच्या घरातहीआहे,
समृद्धीत आणि संस्कारातही !
“शुभम् भवतु”
हेच शब्द सर्वांच्याच ओठी,
त्या कुटुंबासाठी !
☆
© प्रभा सोनवणे
१६ एप्रिल २०२४
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈