सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 232
☆ तो दिवस… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
(जागतिकमासिकपाळीदिवस -२८मे)
☆
मला आठवतो
माझ्या ऋतूप्राप्तीचा दिवस-
20 नोव्हेंबर 1969!
तेरा वर्षे पूर्ण झाली तोच दिवस !
आईने बटाटेवडे आणि शिरा
केला होता ,
वाढदिवस म्हणून !
“मैत्रिणीं ना बोलव” म्हणाली होती !
पण कसं बोलवणार ?
ही गोष्ट लपवून ठेवायची होती मैत्रिणींपासून !
अपवित्र अस्पृश्य हीचभावना
बिंबवलेली मनावर –
मासिकपाळी बद्दल !
तरी ही बंडखोरी केली होती
त्या काळात ,
सत्यनारायणाचे घेतले होते
दर्शन” त्या” दिवसात !
तरी ही जनरीत रूढी म्हणून
बसावेच लागले होते “बाजूला”
माहेरी आणि सासरी ही !
आज इतक्या वर्षाने,
उठले आहे वादळ ,
बाईच्या “विटाळशी”पणाचे !
आम्ही स्विकारलेल्या अस्पृश्यतेचे आणि अपराधी
भावनेने केलेल्या त्या ऋषीपंचमीच्या उपवासाचे काय ?
आता घेतला आहे का नव्या
मनूने जन्म ?
लिहिली आहे का त्याने नवी संहिता रजस्वलेला पवित्र बनविण्याची ?
मला मात्र आज ही आठवतोय तो दिवस –
अपराधीपणाच्या भावनेने संकोचून गेलेला !
(काही मंदिरात महिलांना प्रवेश नाही, त्या संदर्भात सुश्री तृप्ती देसाई यांनी आंदोलन केलं होतं तेव्हा सुचलेली कविता)
☆
© प्रभा सोनवणे
20 नोव्हेंबर 1969 !
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈