सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 234
☆ 🦀 खेकडे 🦀 ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
पुण्याचे काय आणि नाशिकचे काय
सारखेच सगळे खेकडे,
आपण कितीही सरळ जा,
हे आपले वाकडे!
खेकडेच खेकड्यांना
खाली खेचत असतात,
वाकड्या तिकड्या नांग्यानी
ओरबाडत असतात!
आपण असतो मासे किंवा
भित्रे ससे !
कोणी टाकतात गळ,
तर कोणी फासे !
मासोळी होऊन मुक्त
पोहावे म्हटले,
खेकड्यांच्या जगात ऐवढे
भाग्य कुठले?
खेकड्यांना कुणीतरी
असेच आपले म्हटले,
“पाण्यात राहून माशांशी
वैर नव्हे बरे !”
यावर खेकडे मोठ्याने
कुत्सितपणे हसले!
गर्वाने छाती फुगवून असेही म्हणाले,
“मासे ते मासे जगतीलच कसे ?,
पलिकडे काठावर उभे
आहेत बगळे !”
*
खेकड्यांनी हे ही लक्षात
घ्यायला हवे,
असेही कुणी आहेत या जगात,
खेकड्यांचं ते मस्त कालवण करतात,
वाकड्या तिकड्या नांग्या,
दाताने फोडतात!
इथे कधीच कुणाचे,
राज्य नाही टिकत,
प्रत्येकाला कधीतरी,
मरण घ्यावेच लागते विकत!
☆
(अनिकेत मधून… १९९७ नोव्हेंबर)
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈