सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 235
☆ वाट ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
ही वाट कुठे जाते ,
माहित नव्हतं,
तुम्ही भेटलात,
रस्ता रमणीय झाला खरा,
खरं तर आपणच ,
शोधत असतो आपली वाट !
जवळचे वाटणारे ,
नेहमीच असतात……
फक्त सहप्रवासी….
जेव्हा लागतो स्वतःला
स्वतःचा शोध तेव्हा ….
एकांतच वाटतो हवासा—
एकमेकांची गरजही
संपलेली असते ….
भूतकाळ कडू, गोड, तिखट !
म्हणूनच,
या सुनसान एकाकी रस्त्यावर,
आता एकटंच
जावसं वाटतं…
स्वतः इतकी अखेर पर्यंत,
नसतेच कुणाची सोबत….
म्हणतातच ना—-
“अंधारात सावलीही साथ देत नाही”
ही वाटच असते सोबतीण,
दिवसा- उजेडी,
आणि अंधारातही !!
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈