सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 239
☆ मुक्त चिंतन – होते सृजन सर्वत्र… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
मजबूत दगडी वाडा ,
दुमजली प्रशस्त छान
न्हाणीघरही भले थोरले…
बंब, घंगाळ ,सतेले तांब्याचे,
पितळी बादल्या तीन!!
*
ते माझे घर लहानपणीचे,
गावाकडचे ओढ्याकाठी,
पलिकडे शिवालय होते,
वडाच्या झाडा मागे !
*
अंगणात होती बाग,
फुलझाडांची गर्दी—-
वृंदावना पलिकडे विहीर ,
चाफा, कडुलिंब अन,
पाच नांदुर्की -पिंपर्णी !!
*
निसर्ग होता प्रसन्न,
पाऊसपाणी ,आबादानी
मुबलक शेती ,गुरे वासरे,
किलबिलती पक्षी रंगीबेरंगी
होते सृजन सर्वत्र ,
*
चौदा वर्षे टिपले मी ते
निर्मियले मग शब्दामधून
मनोहारी एक चित्र ते…..
ती पहिली कविता …
…सृजन सोहळा
आज आठवला!!
☆
© प्रभा सोनवणे
१३ जुलै २०२४
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈