सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 246
☆ संचित… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
बाहेर पाऊस पडतोय,
मी सोफ्यावर बसून,
मोबाईल वरच्या घडामोडींवर,
करतेय तुरळक कमेंट!
माझी बाई आवरतेय माझं घर,
तिनं केल्या भराभर चपात्या,
घासली भांडी, कपडे धुतले,
धूळ झटकून,
फरशी झाडून, पुसून घेतली !
तिच्या गैरहजेरीत,
मी मुळीच करू शकत नाही,
हे सारं!
तिच्या अनेक दिवसांच्या,
गैरहजेरीत नवीन बाई पाहिली,
अमराठी,
तिला म्हटलं,
“तुमको सब कुछ करना पडेगा,
मैं कुछ नही करती, ये सब ऐसा ही
पडा रहता है ।”
ती म्हणाली, “हाँ… हाँ…. चलेगा ।”
एक महिना काम करून,
घरात रूळत असतानाच,
ती डेंग्यू नं आजारी,
इस्पितळात दाखल!
पुन्हा येऊ लागली,
पहिलीच……
“मदतनीस ” हा शब्द वापरतात,
हल्ली कामवाली साठी !
पण मला “कामवाली” वाटतं,
परफेक्ट!
कारण सारी कामं तिच करत असते,
निगुतीनं, रितसर, पद्धतशीर,
अलिकडे छळतोय मला,
माझाच स्थायीभाव स्पष्टच,
इतकंही नसावंच, आळशी,
निष्क्रिय,
आरामशीर….
कुठल्याच वयात!
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈