सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 249
☆ अमरवेल… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
“अमरवेल” किती सुंदर नाव आहे,
पण ही वनस्पती,
दुसर्याच्या जीवावर जगणारी,
बिनधास्त, बिनदिक्कत!
नाही आवडायचं ,
तिचं हे दुसऱ्याच्या जीवावर,
उड्या मारणं !
अचानकच
जाणवलं—
तिच्यातला चिवटपणाच तिचं
जगणं आहे !
कुणी वंदा कुणी निंदा —-
तिला मिजाशीतच जगायचंय!
आणि असतीलच की,
उपजत काही प्रेरणा स्रोत,
तिच्यातही !
अमरवेल आलेली असते,
काही असे स्थायीभाव घेऊन,
जे असतील ही,
इतरांना त्रासदायक,
पण अमरवेल तग धरून!
ज्याचं त्यानं
जगावं की हवं तसं!
पण काही संकेत पाळायचेच
असतात सगळ्यांनीच!
तर ….
काही गोष्टींना नसतातच,
कुठले नियम वा अटी,
दुसऱ्यांनी नसतेच
ठरवायची इतर कुणाची,
विचारसरणी !
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈