मराठी साहित्य – मराठी कविता – ? प्रेमाला उपमा नाही ? – सुश्री ज्योति हसबनीस
सुश्री ज्योति हसबनीस
? प्रेमाला उपमा नाही ?
प्रेम करावे भरभरून , जीव ओवाळून , कधी कधी स्वतःत रमतांना स्वतःला विसरून !
प्रेम करावे तृणपात्याच्या दंवबिंदूवर
प्रेम करावे उषःकालच्या क्षितिजावर
प्रेम करावे किलबिलणा-या पाखरांवर
प्रेम करावे गंधित वायुलहरींवर
प्रेम करावे शहारणा-या जललहरींवर
प्रेम करावे रविकिरणांच्या ऊर्जेवर
प्रेम करावे चांद्रकालच्या भरतीवर
प्रेम करावे सांध्यकालच्या ओहोटीवर
प्रेम करावे सृष्टीच्या अथक सृजनावर
प्रेम करावे पहाडाच्या उंचीवर
प्रेम करावे सागराच्या अथांगतेवर
प्रेम करावे आकाशाच्या असीमतेवर
प्रेम करावे आईच्या निरंतर वात्सल्यावर
प्रेम करावे बाल्याच्या निर्व्याज हास्यावर
प्रेम करावे दोस्तीच्या निखळ नितळपणावर
प्रेम खळाळत्या बालपणावर करावे
प्रेम सळसळत्या तारूण्यावर करावे
प्रेम शांत समंजस वानप्रस्थावर करावे
सर्व चराचर व्यापून असलेल्या चिरंतनावर तर प्रेम करावेच करावे
© सौ. ज्योति हसबनीस