मराठी साहित्य – मराठी आलेख – ? मोरपीस ? – सुश्री ज्योति हसबनीस
सुश्री ज्योति हसबनीस
मोरपीस
(सुश्री ज्योति हसबनीस जी की लेखनी में एक अद्भुत क्षमता है किसी भी वस्तु, शब्द अथवा भावों को परिभाषित करने की अथवा किसी भी विधा में साहित्य रचने की। संभवतः ‘मोरपीस’ अथवा ‘मोरपंख’ अथवा ‘मोर का पंख’ अनायास ही हमारे नेत्रों के समक्ष न केवल मोर के उस कोमल पंख की झलक दिखलाता है अपितु यह आलेख बचपन से लेकर अब तक की हमारी स्मृतियों में विस्मृत करने हेतु पर्याप्त है।)
एखाद्या शब्दाची कशी आपली एक स्वतंत्र ओळख असते, अस्तित्व असतं. त्याचं दिसणं, असणं, जाणवणं, अगदी रंग, रूप, स्पर्शासकटच अगदी खास त्याचं त्याचंच असतं . गुलाब म्हटला की पाकळ्या पाकळ्यातून डोकावणारा राजबिंडा रूबाब अगदी रूतणाऱ्या काट्यासकट डोळ्यासमोर येतो, तर मोगरा म्हटला की अगदी श्वासा श्वासात भरभरून तनमन धुंद करणारी मोगऱ्याची ओंजळच नजरेसमोर येते, तर प्राजक्त बकुळीचं नाव जरी उच्चारलं तरी नाजुक फुलांचा अंगणभर पडलेला सडा आणि तो नाजूक दिमाख मिरवणारं श्रीमंत अंगणच डोळ्यासमोर साकारतं! रंग रूप स्पर्श गंधाचं अवघं जगच त्या त्या शब्दांमध्ये सामावलेलं असतं.
असाच एक शब्द मोरपीस ! माझ्या फार फार आवडीचा ! कुणी स्तुती केली, जरा शब्दांनी मला कुरवाळलं की अगदी गालावर मोरपीसच फिरवल्याचा भास मला होतो. मोरपीसाचा मुलायम स्पर्श, त्याच्या लोभस रंगछटा, त्याच्या सौंदर्याचं गारूड इतकं आहे ना मनावर की ते सारं मला त्याक्षणी जाणवतं आणि ते शब्द जणू मोरपीसच होऊन माझ्या गालावर आणि नकळत मनातच रूंजी घालू लागतात !!
मोरपीस…बालपणातला अमूल्य खजिना ! पुस्तकात दडवलेलं /दडपलेलं मोरपीस म्हणजे जणू कुबेराची श्रीमंतीच आपली! केवढा तोरा ते ऐश्वर्य मैत्रिणीला दाखवतांना ..बालपणीचा मुलायम स्पर्श ल्यालेलं श्रीमंतीची पहिली ओळख घडवणारं सुंदर मोरपीस …!
मोरपीस ….मेघांनी व्यापलेल्या नभाकडे बधून उत्फुल्लतेने पिसारा फुलवून बेभान नाचणाऱ्या मोराचं पीस ! पावसाची चाहूल लागताक्षणी जलधारांचा उत्सव डोळ्यात जागवत आनंदविभोर होऊन नृत्य करणारा मोर आणि त्याचा सुंदर पिसारा ..किती मोठा आशावाद सूचित करणारा ..!
मोरपीस …इतिहासातली किती तरी प्रेमपत्रे ह्याने खुलवली असणार, प्रेमाच्या जगातले सारे शब्द आपल्या स्निग्ध आर्जवासकट ह्याच्याच मदतीने इष्ट स्थळी पोहोचले असणार, प्रेमी जनांच्या विश्वात अनोखे रंग भरणारं मोरपीस …!
‘मोरपीस’ …..चायनाला’ गेले असतांना तिथे ‘Su embroidery’ हा अनोखा प्रकार बघितला . त्यात कलाकुसर करतांना जे धागे वापरले होते ना त्यात एक मोरपीसाचा धागा पण होता. कित्ती नाजूक, सुंदर, रेखीव आणि नीळ्या हिरव्या रंगांची कलाकुसर डोकवत होती मधून मधून …!
आणि हेही ‘मोरपीसच’…. ‘सावळ्याच्या’ दैवी स्पर्शाने पावन झालेलं, अनोख्या ऐटीत त्याच्या मुकुटात विराजमान झालेलं, शतपटीने देखणं दिसणारं, डौलात विहरणारं… परमात्म्याशी नातं जोडणारं अलौकिक मोरपीस..!
© सौ. ज्योति हसबनीस